छत्रपती संभाजीनगर

क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; चोविस जणांविरुध गुन्हे दाखल

पैठण तालुक्यातील देवगाव तांडा येथील घटना

विजय चिडे/पाचोड : क्षुल्लक कारणावरून दोन गटांत लाठ्याकाठ्या व कुऱ्हाडीने भांडण होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना देवगाव तांडा (ता. पैठण)  येथे घडली असून पाचोड पोलीसांनी एकमेकांच्या परस्पर तक्रारीवरुन चोविस जणांविरुद्ध विविध कलमाखाली बुधवारी (ता.२०) गुन्हे दाखल केले. पवन संजय चव्हाण यांच्या तक्रारी वरुन नऊ तर विकास कल्याण चव्हाण यांच्या तक्रारीवरून पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पवन संजय चव्हाण (वय २१ वर्ष) रा. देवगाव तांडा (ता. पैठण) याने पाचोड पोलीसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी (ता. १९) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास मी व मित्र प्रितम राठोड व अशोक राठोड असे आम्ही देवगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ उभे असताना गावातील विकास कल्याण चव्हाण, अनिल साहेबराव चव्हाण हे त्यांच्या मोटारसायकलवरून तेथे आले व त्यांनी आम्हाला गाडीचा कट मारला. त्यावर तुम्ही आम्हाला गाडीचा कट का मारला असे बोलत असताना विकास व त्याच्या सोबत असलेल्या तीन इसमांनी आम्हाला काही एक न सांगता चापट बुक्क्याने मारण्यास सुरुवात केली व विकास कल्याण चव्हाण याने त्याच्या हातातील काठीने अशोक पंडीत राठोड याच्या पाठीवर मार देवून जखमी केले.त्यानंतर आम्ही आमच्या घराच्या दिशेने पळत निघालो व आम्ही आमच्या घरच्यांना आवाज दिला. त्यावर गावातील साहेबराव शामराव चव्हाण, अनित साहेबराव चव्हाण, कपुर साहेबराव चव्हाण,  कल्याण साहेबराव चव्हाण, आकाश कल्याण चव्हाण,  खंडु कल्याण चव्हाण, विशाल खुशाल चव्हाण, रतन शामराव चव्हाण, सुनिल खुशाल चव्हाण सर्व रा. देवगाव तांडा (ता. पैठण) हे सर्व जण तेथे काठ्या व कुर्हाड घेवुन आमच्या अंगावर धावुन आले व आम्हाला मारायला लागले व म्हणाले कि तु आमच्या नादी लागला तर तुला जिवंत मारुन टाकु असे म्हणुन शिवीगाळ करु लागले. तेव्हा आम्ही जीवाच्या आकांताने जोर जोरात आरडा ओरड केली असता आमचा आवाज ऐकुन माझे आई वडील व गावातील इसम शिवाजी कन्हु चव्हाण ,संजय रामसिंग चव्हाण ,गोरख जनार्धन राठोड , पंडीत हेमा राठोड , निलेश रघुनाथ राठोड, सुधाकर शामा राठोड हे तेथे आले व त्यांनी भांडण सोडविले असल्याचे म्हटले आहे.

तर विकास कल्याण चव्हाण (वय ३६वर्ष)रा. देवगाव तांडा ( ता. पैठण) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी पोलीस खात्यात औरंगाबाद येथे नोकरीस असून मंगळवारी (ता.१९) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास साप्ताहीक सुट्टी असल्याणे मी व माझा मित्र नामे शैलेश पाटील माझ्या मोटारसायकल बुलेट (क्र.एम.एच.२०बी.एक्स. ०७१७)वर बसुन औरंगाबाद येथुन देवगाव तांडा येथे सायंकाळी साडेचार वाजता पोहचलो. मी माझ्या घरी काका, आजी, भाऊ यांना भेटुण परत औरंगाबादला जाण्यासाठी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास निघालो असता गावातील प्रितम रमेश राठोड,  पवन संजय चव्हाण,  अशोक पंडीत चव्हाण हे माझ्या मोटार सायकलीस अचानक आडवे आल्याने आम्ही मोटार सायकल वरून घसरून खाली पडलो, तेव्हा प्रितम राठोड व त्यांचे मित्र यांनी सांगीतले की तु अधुन मधुन तुझ्या काका सोबत का राहतो, तु त्यांना का मदत करतो? असे म्हणुन लाठी, काठी, लोखंडी रॉडने व कु-हाडीने आम्हाला मारण्यास सुरुवात केली. तेव्हा मी माझ्या गावातील माझे काका साहेबराव चव्हाण, रतन शामा चव्हाण यांना फोन करुन बोलवुण घेतले. तेव्हा प्रितम राठोड व त्यांचे मित्र यांनी माझे काका आल्यावर त्यांना पण गावातील गोरख राठोड, शिवाजी कन्हु चव्हाण, धर्मराज शिवाजी चव्हण, नागु रघुनाथ चव्हाण,  रघुनाथ सुका राठोड़ , पंडीत हेमा राठोड, संजय रामसिंग चव्हाण,  जिवन संजय चव्हाण, अर्जुन जनार्धन राठोड, कपील सुभाष राठोड, चेतन गोरख राठोड, लखन शिवाजी चव्हाण या सर्वांनी  साहेबराव शामा चव्हाण यांनी घेतलेल्या गावातील माशाचे तळयाचे टेंडरच्या वादातुन मी गावातील रस्त्याने बाहेर निघताना प्रितम राठोड व इतरांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन आम्हास अडवुन मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच बुलेटच्या टाकीवर दगड घालुन टाकी फोडुन अंदाजे पंचवीस ते तीस हजाराचे नुकसान केले असल्याचे  म्हटले आहे. या दोघांच्या परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त चोवीस जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे व त्यांचे सहकारी करीत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button