महाराष्ट्र
इपीएस ९५ पेन्शनधारकांचा औरंगाबाद येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ कराड यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय मेळावा
श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : रविवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. अग्रसेन भवन, टाऊन सेंटर, सिडको बस स्थानक जवळ औरंगाबाद येथे इपीएस ९५ पेन्शनधारकांचा सपत्नीक राज्यस्तरीय भव्य मेळावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत, मा.आ.अतुल सावे, राष्ट्रीय महासचिव विरेंद्रसिंग राजावत, राष्ट्रीय मुख्य सल्लागार पी एन पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय संघटक सचिव पश्चिम क्षेत्र सुभाष पोखरकर यांनी श्रीरामपूर येथे बैठकीत दिली.
पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढीचा प्रश्न प्रलंबित असल्याने प्रश्न लवकर मार्गी लावावा यासाठी देशभर मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. पेन्शनधारकांना रु ७५००/-किमान पेन्शन व त्यावर महागाई भत्ता मिळावा. मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, सुप्रीम कोर्टाचा सन्मान ठेवून वास्तविक वेतनावर पूर्ण पेन्शनचा मार्ग मोकळा झाला पाहिजे. या योजनेपासून वंचित लोकांना सभासद करून किमान रु ५०००/- त्यांना मिळावेत. अशा न्याय्य मागण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला जात आहे. देशातील ६७ लाख पेन्शनधारकाना एकत्रित संघटीत करून सुमारे २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशमध्ये रा. स. समिती माध्यमातून या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. सध्याची परिस्थिती व भविष्यातील नियोजन यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास रमाकांत नरगुंड, सी एम देशपांडे, रणजितसिंह द्सुंदी, तपन दत्ता, एस एन आंबेकर, श्रीमती शोभाताई आरस, सरिता नारखेडे, कमलाकर पांगारकर, जयश्री किवळेकर, माधुरी जोशी, कविता भालेराव, सुभाष पोखरकर, सुधीर चांडगे, डी एम पाटील, निर्मला बडवे, आशाताई शिंदे, देवीसिंग अण्णा जाधव, डी ए लिपने, दादाराव देशमुख, भास्करराव मतसागर आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन औरंगाबाद संघटना पदाधिकारी तसेच उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण होन, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संपत समिंदर, एस के सय्यद, श्रीगोंदा अध्यक्ष भगवंतराव वाळके, नेवासा अध्यक्ष बापूराव बहिरट, राहाता अध्यक्ष सुकदेव आहेर आदी नगर जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी केले आहे. त्याचप्रमाणे २१ ऑक्टोबर पेराम्बुर [चेन्नई] २२ ऑक्टोबर ललितनगर हैद्राबाद, दि. २४ ऑक्टोबर रोजी दीपमाला पागारणी संस्कार स्कूल बैरागड भोपाळ येथे व ३१ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे भव्य मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्यास श्रीरामपूर, श्रीगोंदा, कोपरगाव, नेवासा संगमनेर इ ठिकाणाहून पेन्शनधारक जाणार आहेत.