छत्रपती संभाजीनगर

कोविडच्या प्रतिबंधात्मक कामकाजातून शिक्षकांना कार्यमुक्त करा


महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची मागणी

विलास लाटे/पैठण : मागील दीड वर्षात जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. मात्र नुकतेच शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसह सूरु करण्यात आले आहेत. तर इयत्ता पहिली ते चौथीच्या शिक्षकांना शासन निर्देशानुसार शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक असून दिलेली शैक्षणिक जबाबदारी पार पाडण्याचे कर्तव्य निभावणे आहे. यासाठी शिक्षकांना कोविडच्या प्रतिबंधात्मक कामकाजातून कार्यमुक्त करा अशी मागणी नुकतीच महाराष्ट्र राज्य सेनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली.

दरम्यान सध्याही तालुकाभरातील अनेक शिक्षकांना कोविड-१९ संदर्भातील लसीकरण व इतर काही जबाबदारी देखील देण्यात आलेली असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. शिक्षण आयुक्तांच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या दि. १ ऑक्टोंबरच्या आदेशातील निर्देश क्र.६ नुसार कोविडच्या प्रतिबंधात्मक कामकाजा करिता शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. शाळा सुरू झाली असल्यामुळे शिक्षकांना शाळेवर रुजू होण्याकरिता कोविडच्या कामकाजामधून कार्यमुक्त करणेबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणेस कळवून उक्त शिक्षक शाळा स्तरावर लवकरात लवकर रुजू होतील, याची दक्षता घ्यावी. असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले असतानाही तालुकाभरात शिक्षण विभागाकडून याबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या दिसून येत नाहीत. तरी शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी याबाबत गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करावी व शिक्षकांना या कामकाजातून कार्यमुक्त करण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा, असे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने नुकतेच तहसील कार्यालयासह पंचायत समितीच्या दोन्ही कार्यालयांना देण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी कार्यालयाकडून गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत शिक्षक सेनेला असे ठोस आश्वासन देण्यात आले की, तात्काळ दोघांच्या संयुक्त स्वाक्षरीने तहसील कार्यालयास पत्र लिहून शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येईल.

यावेळी शिक्षक सेनेच्या वतीने तालुकाप्रमुख अमोलराजे एरंडे, सरचिटणीस कैलास मिसाळ, कार्याध्यक्ष अमोलराज शेळके, कोषाध्यक्ष लक्ष्मण गलांडे, केंद्रप्रमुख सुभाष शिंदे, मुख्याध्यापक प्रकाश लोखंडे, मुख्याध्यापक मंगला मदने, कार्यालयीन सचिव श्रीकांत गमे, किशोर तोतरे, सहकोषाध्यक्ष राहुल गिरगे, वस्तीशाळा समन्वयक युनूस शेख, केंद्र समन्वयक हनुमंत पंदे, भागवत फुंदे, ज्ञानेश्वर नागरगोजे यांची विशेष उपस्थिती होती.

शाळा सुरू झाल्या असल्याने तसेच विद्यार्थ्यांचा मागे पडलेला अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यायचा असल्याने बहुतांश वेळ शाळेत द्यावा लागणार आहे, परिणामी अतिरिक्त तास घ्यावे लागणार आहे म्हणून प्रशासनाने इतर अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करावी.

अमोल एरंडे, तालुकाप्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पैठण

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button