अहिल्यानगर
माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या कोविड ड्युटी रद्द कराव्यात -शिक्षक भारतीची मागणी
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : कोरोनाचा जोर ओसरल्यामुळे शासन आदेशाप्रमाणे ४ ऑक्टोबर २०२१ पासून ५ वी ते १२ वी वर्ग सुरू झाले आहेत, त्यामुळे माध्यमिक विद्यालयात ५वी ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना कोविड आजाराच्या निवारणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर ड्युट्या लावण्यात येऊ नये अशी मागणी राहुरी’चे तहसीलदार यांच्याकडे आमदार कपिल पाटील व राज्याअध्यक्ष अशोक बेलसरे, जिल्हाध्यक्ष आपासाहेब जगताप, राज्यसचिव सुनील गाडगे यांंच्या मार्गदर्शनानुसार शिक्षक भारतीचे राहुरी तालुकाध्यक्ष संभाजी पवार यांंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली आहे.
यावेळी शिष्टमंडळाने चर्चा करताना सांगितले की, शिक्षकांनी कोरोना काळात कोविड सेंटर ड्युटी, लसीकरण, चाचणी, ट्रेसिंगचे मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे. आता माध्यमिक शाळा सुरू झाल्याने अध्यपकाना प्रथम सत्र पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना कोविड ड्युटीमधून वगळावे कारण शाळेमध्ये देखील कोरोना विषयक विद्यार्थ्यांची काळजी अध्यपकाना घ्यावी लागणार आहे. आज अनेक विद्यालयात अपुरे असलेले शिक्षक व कर्मचारी वर्ग यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्मचारी नियुक्त करू नयेत, असे निवेदनात म्हटले आहे. महसूल अव्वल कारकून शैलजा देवकाते यांनी तहसिलदारांच्यावतीने निवेदन स्वीकारले. निवेदनावर शिक्षकभारती संघटनेचे अध्यक्ष संभाजी पवार, उपाध्यक्ष संतोष मगर, सचिव संजय तमनर, प्रकाश तनपुरे, आनिल लोहकरे, बाबासाहेब पटारे, विजय वाघ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.