कोणत्याही निर्णयाविना शिक्षक पतसंस्थेची बैठक गुंडाळली
◾केवळ संचालकांच्या हिताचे बेकायदेशीर ठराव घेतल्याचा शिक्षक सेनेचा आरोप
विलास लाटे/पैठण : नुकतीच पैठण तालुका शिक्षक पतसंस्थेची २०२०-२१ या अहवाल वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष आबासाहेब कणसे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेतून शिक्षक सभासदांच्या हिताचा एकही निर्णय न घेण्यात आल्याने सभासदांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
या सभेत संचालक मंडळाकडून केवळ स्वः हिताचे ठराव मांडण्यात आले. मात्र या ठरावावर ना आवाजी मतदान घेण्यात आले, ना चॅटबॉक्स मध्ये लेखी मतदान मागविण्यात आले. अनेक ठरावांना सभासद नामंजूर करत असतानाही संचालकांनी रेटून विषय पुढे नेत सभासदांच्या भावनांचा गळा घोटल्याचा आरोप शिक्षक सेनेचे तालुका प्रमुख अमोल एरंडे यांनी केला.
बैठकीच्या अहवाल वर्षात कोरोना काळ असल्याने संस्थेचा मोठा खर्च वाचून देखील संस्थेचा नफा अवघा ३० हजार रुपयांनी वाढला. तरीही सभासदांना मात्र मागील वर्षीपेक्षा लाभांश कमी वाटण्यात आला. ऑनलाइन बैठका होऊन देखील संचालकांनी पतसंस्थेच्या पैशावर डल्ला मारत संपूर्ण भत्ता घेतला. अनेक ज्येष्ठ सभासदांनी व्याजदर एक टक्का कमी करून ते नऊ टक्के करण्याची मागणी करूनही व या ठरावाला सर्वांची संमती असतानाही संचालक मंडळाने ही मागणी धुडकावून लावली.
शिक्षक पतसंस्थेचे विद्यमान सचिव देखील अहवाल वर्षात थकबाकीदार असल्यानेच संचालकांच्या बोटचेपी धोरणामुळे संस्थेचा नफा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. सभासदांकडून कमी फी आकारणारा ऑडिटर देण्याची मागणी असतानाही संचालकांना टक्केवारी मिळावी, यासाठी त्यांच्याकडून अगोदरच निवडण्यात आलेल्या ऑडिटरला उपस्थित सभासदांनी नामंजूर करून देखील विषय रेटण्यात आला.
तब्बल तीन तास चाललेली ही बैठक शिक्षक सेनेचे पदाधिकारी महेश लबडे, कैलास मिसाळ, पांडुरंग गोर्डे, अमोलराज शेळके, लक्ष्मण गलांडे, जनार्धन दराडे, संदीप घनवट, बाळासाहेब घुगे, नितीन कपटी, नारायण बहिर, मंगला मदने, सुमंजली बनसोडे, आदी अभ्यासू सभासदांनी चर्चा घडवून आणल्याने संचालकांचे पितळ उघडे पडून प्रचंड वादळी ठरली. अखेरीस संचालकांनी होणारा मोठा विरोध पाहता सर्वांचे माइक बंद करून सरळ सभा आटोपती घेऊन राष्ट्रगीताने सभा गुंडाळून टाकली.
__________________________
बेकायदेशीर सभेविरोधात तक्रार दाखल करणार!
शिक्षक पतसंस्थेच्या झालेल्या ऑनलाईन बैठकीत संचालक मंडळाने हुकूमशाही करून कोणत्याही ठरावास सभासदांची मान्यता घेतली नाही. जे ठराव सभासदांनी अमान्य केले, ते संचालकांनी रेटून नेल्याने ही सभा बेकायदेशीर ठरते.याबाबत लवकरच संपूर्ण पुराव्यानिशी सभासदांच्या वतीने योग्य ती कायदेशीर तक्रार दाखल केली जाणार आहे.
– अमोल एरंडे, तालुका प्रमुख शिक्षक सेना
___________________________