कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
विजय चिडे/ पाचोड : कर्जबाजारी पणाला कंटाळून ५५ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथे शुक्रवारी (दि.२४) रोजी सकाळी दहाच्या दरम्यान उघडकीस आली आहे. बाबासाहेब यशवंत काळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील शेतकरी बाबासाहेब काळे या शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले आहे. बाबासाहेब काळे हे सकाळी नऊच्या दरम्यान घरून आपल्या शेतात गेले होते. त्यांनतर घरातील व्यक्ती शेतात गेले असता त्यांना बाबासाहेब काळे यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे समजले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती गावातील बाप्पासाहेब चावरे, उध्दव चावरे, अनिस पटेल, संतोष पांढरे यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून काळे यास खाजगी वाहनाव्दारे उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
बाबासाहेब काळे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना अडीच एकर शेती असुन त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालत होता. मात्र गत आठवड्यात झालेल्या पावसाने शेतातील माल खराब झाला. त्यांच्यावर सहकारी सोसायटीचे कर्ज असून खाजगी ५० हजार रुपये कर्ज होते. अशी माहिती त्यांच्या नातेवाईंनी दिली आहे. हे कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेत त्यांनी २४ सप्टेबर रोजी सकाळी दहाच्या दरम्यान विषारी औषध प्रशान करुन आपली जीवनयात्रा संपविली आहे. काळे यांना पाचोड येथिल ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिवाजी पवार यांनी त्यास मृत घोषित करुन त्यांची उत्तरीय तपासणी केली.
कोळीबोडखा येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, दोन नांतवडं असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रमेश शिंदे, फेरोज बरडे करीत आहेत.