खोटी तक्रार दाखल करणारा ट्रक मालक, साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
विलास लाटे/पैठण : फायनान्स कंपनीचे पैसे बुडविण्यासाठी हायवा ट्रकची परस्पर विक्री करुन हायवा चोरी झाल्याचा खोटा बनाव करुन खोटी फिर्याद दाखल करत पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक करुन फसवणूक करु पाहणाऱ्या हायवा मालकासह त्याच्या साथीदाराच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे.
अधिक माहिती अशी की, हायवा मालक स्वप्निल साईनाथ गायकवाड (वय ३०, एन-२ सिडको, औरंगाबाद) याने राजेंद्र भिमराव आहेर यास पैशाचे आमिष देऊन हायवा चालक भासवून वाहेगाव येथील सोपान बोबडे यांच्या शेतात उभा केलेला हायवा क्रमांक (एम.एच-२०-ई.एल-१५०४) हा चोरी गेला असल्याचा खोटा बनाव करुन खोटी तक्रार दाखल करण्यास प्रवृत्त केले. त्यावरुन आहेर याने पैशाच्या लालसेपोटी गायकवाड यांच्या सांगण्यावरून दि.३ सप्टेंबर ला पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात हायवा ट्रक चोरी गेला असल्याची खोटी तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वप्निल गायकवाड व रुपेश काळवणे या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर हायवा ट्रकचा मालक स्वप्नील गायकवाड याने मित्र रुपेश रविंद्र काळवणे (वय २९ वर्ष, रा. बंजारा कॉलनी, औरंगाबाद) याच्या मध्यस्थीने खुलताबाद येथील एका इसमास ४ लाख १५ हजार रुपयांत एक वर्षाच्या तोंडी करारावर वाहन चालविण्यासाठी दिले होते व त्यानंतर दोन तिन दिवसांनी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्यादीस हायवा ट्रक चोरी झाल्याची खोटी तक्रार देण्यास सांगितले असे तपासात निष्पन्न झाले. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुलताबाद येथे जाऊन सदर गुन्हयांतील सहा लाख रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा हायवा ट्रक, ३५ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल हॅन्डसेट असा एकुण ६ लाख ३५ रुपये किंमतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला असुन नमुद आरोपींना गुन्ह्यातील जप्त मुद्यमालांसह पुढील तपासकामी पैठण एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निमीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक, डॉ.पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोउनि विजय जाधव, पोहेकॉ प्रमोद खांडेभराड, किरण गोरे, संजय काळे, पोना नरेंद्र खंदारे, शेख नदीम, योगेश तरमाळे, जिवन घोलप, संतोष डमाळे यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस करत आहेत.