महाराष्ट्र

बोरीजवळ रस्त्यावरुन बस उलटली; चालकासह सात प्रवासी जखमी

बोरी/प्रतिनिधी जिंतूर तालुक्यातील बोरीजवळ महानुभाव आश्रमाच्या समोर जिंतूर-परभणी महामार्गावर सोमवारी (दि.6) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरुन बस उलटल्याची घटना घडली. या अपघातात चालकासह 7 प्रवासी जखमी झाले असून बोरीतील रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना परभणीला हलविण्यात आले आहे.


जिंतूरहून परभणीला जाण्यासाठी प्रवासी घेवून निघालेल्या बस(एम.एच. 20 बी.एल. 3494) ला अपघात झाला. रस्त्याच्या बाजूला दहा फूट खोलीच्या अंतरावर ही बस पलटी होऊन कोसळली. याप्रसंगी गाडीत 30 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या भीषण अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी शेतकरी अतुल भिसेद व रस्त्यावर काम करणार्‍या कामगारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींंना खाजगी गाडीत टाकून दवाखान्यात उपचाराकरिता नेण्यास मदत केली. तसेच घटनेची माहिती मिळताच बोरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद ज-हाड, पोलीस उपनिरीक्षक संजय वळसे, पंडित शिरसे, सहायक पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, तूपसमींदर, काळे, माने, रफिक, कंठाळे, शेंडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिंतूरच्या आगारप्रमुखांना याबाबतची माहिती देण्यात आली. यानंतर आगारप्रमुख व्ही.आर. चिभडे, सह वाहतूक निरीक्षक एन.टी.गावंडे, वाहतूक लिपिक जी.के.घुगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली.

मनकर्णाबाई लक्ष्मण वैद्य (वय 50 रा. मंठा), शेख कालू (वय 65 रा. जिंतूर), संगीता युवराज कोळी (वय 23 रा.जिंतूर), जैबूनिसा रा.सेलू), आसिफा (रा.सेलू), शांताबाई बाबाराव कोळी (वय 45 रा.जिंतूर) तसेच बसचालक दत्ता नारायण घुगे (वय 45 रा.अंंगलगाव) यांना अपघातात जबर दुखापत झाली आहे.

Related Articles

Back to top button