प्रासंगिक
नेतृत्व विचार ठरवतात आणि विचार आयुष्याची दिशा…
तुमचे विचार, तुमची वागण्याची पद्धत हे तुमचं नेतृत्व कोण करत यावर ठरतं, आणि त्यामुळेच आयुष्यात प्रत्येकाला योग्य नेतृत्वाची गरज असते याला काहीच दुमत नाही. तुमच्या वाचनातून, तुमच्या शिक्षणातून, तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात कित्येक संस्कार तुमच्यावर होतात आणि अशाच संस्कारात आपलं नेतृत्व कस असावं हे ठरत. पण याला कोणी रोखू शकत नाही कारण ते परिस्थितीतून निर्माण होत. आणि कधी कधी चुकीचं नेतृत्व आपल्याला खूप वाईट अनुभव देऊन जातात. त्यामुळेच कधी आपला नेता, आपला आदर्श, आपले मार्ग आणि त्या मार्गावर आपले साथ देणारे किंवा नेतृत्व करणारे कसे असावे याचा नेहमी खूप विचार करणं गरजेचं असतं.
अगदी आवडते, सुंदर वाटणारे नेतृत्व आपल्याला चुकीच्या मार्गाने तर नाहीना घेऊन जात याचा गंभीर विचार करूनच पाऊलें टाकायला हवी. नाहीतर असे नेतृत्व करणारा स्वतःही संपतो आणि आपल्याला ही संपवतो. या सर्वांच्या मुळाशी खरतर एकचं गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुमचे विचार, कारण हे विचारच आपल्याला नेतृत्वाच्या मागे खेचण्याच काम करतात. मान्य आहे कधी कधी पर्याय नसतानाही चुकीच्या नेतृत्वाची साथ मिळते पण त्यामुळे आपल्या विचारांना तिलांजली देणे म्हणजे त्या नेतृत्वाला स्वीकारणं असेच होतं. अशा नेतृत्वाला कित्येक गुण असावेत ज्याने चांगल्या विचारांचा मार्ग तयार होतो. अशा नेतृत्वाला कोणते विचार, गुण, ताकद असायला हवी याचा थोडा विचार करूयात…
१. योग्य दिशादर्शक नेतृत्व :-
नेतृत्व म्हटलं की एक दिशा ठरवली जाते. त्या मार्गावर कस जायचं याचा संपूर्ण निर्णय नेतृत्व कोण करत यावर ठरवला जातो. त्यामुळे अशा वेळी आपला दिशादर्शक किंवा आपला नेता ज्याच्याकडे त्या मार्गावर जायचा पूर्ण विचार असतो. येणाऱ्या परिस्तिथीला कस सामोरं जायचं याचा विचार असतो. अशा योग्य नेत्याची निवड करणे यालाच म्हणायचं योग्य दिशादर्शक नेतृत्व. ज्याला आपण आपल्या गटाचा मुखिया किंवा नेता म्हणतो त्याचा हा विचार संपूर्ण स्पष्ट असायला हवा. ज्यामुळे त्याच्या सोबत येणारे सर्व योग्य मार्गावर चालतील.
२.अभ्यासू नेतृत्व :-
तुम्ही ज्याला आदर्श मानता किंवा जो तुमचे नेतृत्व करतो असा माणूस तितकाच अभ्यासू असणं खूप गरजेचं असतं. अशा नेतृत्वाला आपण अभ्यासू नेतृत्व म्हणतो. अशा नेतृत्वामुळे आपल्यावर त्याच्या विचारांचा प्रभाव पडतो आणि आपणही तसाचं विचार करायला लागतो. अभ्यासू नेतृत्व कधीही त्याच्या सोबत असणाऱ्या लोकांना मागास किंवा अज्ञानी राहू देत नाही. आपल्या सोबत घेऊन जाणं त्याच्या समस्या त्याचे दुःख आपलंसं करणं हे अशा नेतृत्वाला सांगायची गरज पडत नाही. तसेच असे नेतृत्व आपल्याला येणाऱ्या परिस्तिथीला अभ्यासपूर्वक समोर जायला शिकवते.
३.विश्वासू नेतृत्व :-
आपल्या विचारांचं किंवा आपल्या संघटनेच नेतृत्व करणारा नेता हा विश्वासू असायला हवा यात काहीच शंका नाही. आपण कोणतीही गोष्ट त्याच्यासमोर अगदी कोणताही संकोच न बाळगता बोलता आली पाहिजे अशा नेतृत्वाला विश्वासू नेतृत्व म्हणायला हवं. आपण त्याच्या निर्णयात अगदी कोणताही वाद किंवा भिती न बाळगता विश्वास ठेवायला हवा असे वाटणे म्हणजेच असे नेतृत्व हे विश्वासू असते. असा विश्वास त्या नेत्यावर सर्वांचा असायला हवा हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण ज्याला आदर्श मानतो ज्याच्या विचारांचं आपण पालन करतो अशा व्यक्तीच्याही विचारांवर आपला तितकाच विश्वास असायला हवा. तरच ते नेतृत्व उपयोगी ठरेल.
४. चारित्र्यसंपन्न नेतृत्व :-
आपला नेता चारित्र्य संपन्न आहे की नाही यावर आपलेही याबद्दलचे विचार ठरतात असे म्हणायला काहीच हरकत नाही. चारित्र्य चांगले असणे खूप महत्त्वाचे असते कारण त्यावरून त्या नेत्याची आपल्या नेतृत्वा बद्दलची योग्यता ठरवली जाते. आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी आपण करतो आहोत का? किंवा केल्या आहेत का? की ज्याचा परिणाम आपल्या विचारांवर चालणाऱ्या लोकांवर होईल. याचा विचार नेतृत्व करणाऱ्यांनी करायला हवा हे मात्र नक्की. आणि आपला आदर्श असणारे नेते अशा चारित्र्य संपन्न नेतृत्वात बसतात का याचा त्यांचे विचार पाळणाऱ्यानी ही करावा.
५.संघटित करणारे नेतृत्व :-
समाज हा वेगवेगळ्या विचारधारेत चालणारा आहे, पण त्या सर्वांना संघटित करून सोबत घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाला संघटित नेतृत्व म्हणावं लागेल. हल्लीच्या काळात असे नेतृत्व मिळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कित्येक लोक जाती, धर्म, पंत अश्या कित्येक गोष्टीत विभागून गेले आहेत. अशा लोकांना एका विचारधारेत आणण्याची गरज आता आहे. आणि अश्या नेतृत्वाचा अभाव जाणवतो आहे. त्यामुळे आपण आपला आदर्श, आपल्या विचारधारेचा मार्ग निवडताना असा नेता, नेतृत्व निवडायला हवा की ज्याला अशा वेगवेगळ्या विचारधारेला एकत्रित करण्याची ताकद आहे.
६. निर्णयक्षम नेतृत्व :-
कधी कुठे कोणती परिस्थिती येईल हे कधीच कोणाला सांगता येत नाही. पण त्या परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरे जाणे यालाच म्हणायचं निर्णयक्षम नेतृत्व. अशा निर्णयामुळे आपल्या सोबत असणाऱ्या सर्व लोकांवर परिणाम होतो. निर्णय अशी गोष्ट आहे की ज्याचा परिणाम वाईट किंवा चांगला या प्रकारात सांगता येईल. पण निर्णय घेणारा कसा आहे त्याच्यावर हे सारं अवलंबून असतं हे मात्र खरं. त्यामुळे आपण एखाद्या परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकतो का ? या एका प्रश्नाच्या उत्तरात या नेतृत्वाची ताकद आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण जे विचार स्वीकारतो, ज्याला आदर्श मानतो अशा गोष्टींमुळे होणाऱ्या बदलात, बदलणाऱ्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवायला हवी.
७.निडर नेतृत्व :-
नेतृत्व करणं हे इतकं सोप्पं नसतं. मग ते कोणत्याही बाबतीत असो. त्यामुळे कित्येक आपल्या सोबत चालणारे, आपल्या विचारांवर चालणारे, आपल्या निर्णयावर चालणारे याच्यावर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना अगदी निडर होऊन निर्णय घेणारा नेताच खंबीर नेतृत्व करू शकतो. अशा नेतृत्वाला क्षणात परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याची ताकद असायला हवी. ज्याच्या प्रभाव होणाऱ्या बदलात भेटतो. आपण जे करतोय ते योग्य की अयोग्य याचाही विचार व्हायला हवा. घेतलेल्या एका निर्णयावर पुन्हा माघार नाही अशाच नेतृत्वाला साहजिक कित्येक लोक साथ देतात. अशा लोकांचे विचारही आत्मसात केले जातात. त्यामुळे नेतृत्व निडर असायलाच हवं.
८.प्रभावी नेतृत्व :-
आपल्या नेतृत्वाखाली, कित्येक आपले विचार लोक आत्मसात करत असतात याचा कदाचित खूप कमी लोक विचार करतात. पण आपण ज्याच्या विचारांवर चालतो त्याचा प्रभाव नक्कीचं सर्वांवर असायला हवा. नाहीतर संघटना मध्ये विचारांची दुफळी निर्माण व्हायला वेळ लागत नाही. आपले विचार प्रभावीपणे मांडायची ताकद नेतृत्वात असायला हवी. अशा प्रभावी नेतृत्वाखाली लोक नक्कीचं खूप प्रगती करतात हे मात्र नक्की.
९.कार्यक्षम नेतृत्व :-
नेतृत्व म्हटलं की जबाबदारीच काम आलेच. अशावेळी कार्यक्षम असणं खूप गरजेचं असतं. कारण नेतृत्व करणाऱ्या लोकांमुळे इतर लोक प्रभावित होतात आणि त्याच्या सारखे वागायला जातात. यालाच कदाचित विचारांचा प्रभाव म्हणायला हरकत नाही. त्यामुळे नेतृत्व करणारा नेता हा कधीही कार्यक्षम आणि उत्तम कार्य करणारा असावा. कोणतीही जबाबदारी क्षणात स्वीकारणार असायला हवा. त्यामुळं अशा नेतृत्वाला कार्यक्षम नेतृत्व म्हणतात. ज्याचा परिणाम आपले विचार, आपल्याला आदर्श मानणाऱ्या लोकांवर होतो. कारण असे लोक आपल्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळी नेतृत्व जर उत्तम कार्य करणारे असेल तर त्याचे सोबती नक्कीच उत्तम कार्य करतील यात काहीच शंका नाही.
१०.सकारात्मक नेतृत्व :-
सकारात्मक या एका शब्दातच नेतृत्व कस असावं हे कळून येत. आपण ज्यांना आदर्श मानतो त्या व्यक्ती कश्या असाव्यात तर त्या नेहमी सकारात्मक विचार मांडणाऱ्या असाव्यात आणि अशा नेतृत्वाला सकारात्मक नेतृत्व म्हणाला हवे. अशा नेतृत्वामुळे आपल्या विचारांणाही एक सकारात्मक पाहण्याची सवय होते. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाताना सकारात्मक विचार मांडणाऱ्या आपल्या नेत्यांमुळे आपले निम्मे काम तिथेच पूर्ण होते यात काहीच शंका नाही. आणि आपण चालत असलेल्या मार्गावरही एक वेगळीच ऊर्जा मिळते हे वेगळं सांगायची गरज पडत नाही ते आपण आपल्या विचारातून, कामातून दाखवून देतो हे मात्र नक्की. त्यामुळे नेतृत्व नेहमी सकारात्मक असायलाच हवं.
अशा काही मुद्द्याकडे पाहिल्यावर आपण नक्कीचं याचा विचार करायला लागतो यात काही शंका नाही. खरंतर नेतृत्व ही संकल्पना खूप मोठी आहे. विचारांचे नेतृत्व, म्हणजे आपण कोणते विचार आत्मसात करतो त्याला एक प्रकारे नेतृत्वच म्हणायला हवं. त्यामुळे विचार कोणाचे, कशे निवडतो हे नक्कीच पहा. राजकीय नेतृत्व हे नक्कीच चाणाक्ष, हुशार आणि निडर असायला हवं यात काहीच शंका नाही. राजकारण करायचं म्हणजे डोक्याचा खेळ अशावेळी आपण कोणाचे नेतृत्व स्वीकारतो किंवा करतो यावर सगळं ठरत. मैत्री मधील नेतृत्व ही म्हणा, कारण मित्र हा सुद्धा खूप ठिकाणी नेतृत्वाची भूमिका बजावत असतो हे विसरून चालणार नाही, त्याचे विचार हे नक्कीच योग्य असायला हवे. अशा गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण आपल्या आयुष्यात आपले नेतृत्व, विचार कसे असावे याचा गंभीर विचार करु हे मात्र नक्की, कारण नेतृत्व विचार ठरवतात आणि विचार आयुष्याची दिशा…
श्री योगेश खजानदार
बार्शी, सोलापूर
संपर्क – 9923777633