प्रासंगिक
तरुणाई अन राजकारण
२०२२ जिल्हा परीषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे सर्वत्र वाहू लागलेत. अनेक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून, वाढदिवस साजरे करून सामाजिक उपक्रम राबवून लोकांपर्यंत अन नेत्या पर्यंत आपली छाप पाडत आहेत. राजकारणात एक नवीन लाट येऊ पाहतेय. तसा तरुणाईचा आणि राजकारणाचा सहवास खूप जुना. पण एका नव्या विचारांची, नव्या जोमानी येणारी हि नवीन पिढी आज राजकारणाला खऱ्या अर्थानी बदलू पाहतेय. पण का खरच चित्र बदलतंय? ह्याचा थोडा विचार करायला हवा.
गावाकडून शहरात शिक्षणासाठी येणं, ते शिक्षण करताना धडपड काही कमी नाही, अडचणीही अनेक पण तरीही गावाकडच्या राजकारणात रस घेणारी, आपल्या परीनं योगदान देणारी.
आजकालची तरुणाई बेताल, बेधुंद! त्यांना कशातच रस नाही! एकीकडे असले आरोप आणि एकीकडे सक्रिय असलेला हा तरुणाईचा लोंढा! पण तरुणांच्या चळवळीला का खरच न्याय देते आजचे राजकारण आणि राजकारणी? कि स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त त्यांच्या कौशल्यांचा वापर करून घेतला जातोय? मोठ-मोठी अन चक्क खोटी रामराज्याची स्वप्न किती दिवस दाखवली जाणार आहेत आपल्याला? हेच काही कळत नाही आजचा तरुणांकडुन पुढारी फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी आज तरुण मंडळीला जवळ करत असल्याचे चित्र मला दिसत आहे आणि राजकारणी हा देखावा ही करत आहेत. राजकीय पुढारी वापरून गेल्याचे चित्र राजकारणा वरुन चित्र पाहायला मिळत आहे. आजच्या तरुणांच्या हाताला काम नाही. याचाच फायदा राजकारणी लोक घेत आहेत.
मी आजचा सुशिक्षित तरुण !
मी चळवळीत उभा आहे… पण चळवळ कसली? का? हे मला ठाऊक नाही.
आंदोलनाचे मुद्दे मला पटोत अगर न पटोत, हातात माझ्या झेंडे! पाठीवर पोलिसांचे दांडके पण माझ्याच!
नेत्याचा हेतू मला कळो न कळो, त्याच्या सभांना मी गर्दी करणार! त्यांनी दोस्त म्हणून खांद्यावर हात ठेवला, म्हणजे माझं आयुष्य फळणार! हे तर नक्कीच आहे.
होय! मी आजचा सुशिक्षित तरुण!
अन दोष का फक्त ह्या राजकारण्यांचा आहे का?
नाही! खरं तर दोष आपला सर्वांचाच. आपण आपल्या डोळ्यावर झापड बांधून जगतोय. स्वतःच स्वतःची फसवणूक करून घेतोय. ‘भारत हा अनुयायांचा देश आहे!’ आणि आजही आपण डोळे बंद करून अनुयायी होऊन त्या गर्दीचा भाग होतोय. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीने आपल्याला आंबेडकर, गांधी, टिळक नाही दिले तर त्यांचे विचार दिले. पण नेहमीप्रमाणे आपल्याला हवेत पुतळे! प्रसंगी फुलहार घालून उत्सव करायला अन प्रसंगी चपलांचे हार टाकून दंगली करायला. आपल्याला हवेत नेते, चुकांचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडायला. आपण फक्त जमाव बनवण्यात त्यांची मदत करतोय. ‘प्रत्येक सक्रिय कार्यकर्ता हा उच्च महत्वकांक्षा असलेला राजकीय नेता असतो ‘ अस वाचल होतं. पण आपली उडी फक्त इतरांची खुशमस्करी करण्यापर्यंतच आहे तर खंरच आहे.
आणि हाही का प्रस्थापित राजकारण्यांचा दोष?
‘ शिवाजीराजे जन्माला यावे पण शेजारच्या घरात ‘ ह्या मनोवृत्तीतून आपल्यातून कुणी पुढे येत नाही. आपण प्रश्नच विचारत नाही. कारण प्रश्न करायला आपल्याच संकल्पना अजून स्पष्ट नाहीत. आपण कोणत्या बदलाची आशा करतोय? कोणत्या उद्याच्या ग्रामीण विकासाची स्वप्न पाहतोय? आणि का खरच ह्या राजकीय नेत्यांची इच्छा आहे का, आपली ती स्वप्न पूर्ण करण्याची? हे सारे प्रश्न आज आपणच स्वतःला विचारले पाहिजेत. प्रवाहासोबत वाहत जाण्याची वृत्ती बदलण्याची अत्यंत गरज आहे.
इतिहास आपोआप घडत नसतात, ते घडवावे लागतात. संपूर्ण पिढी जेव्हा एका विचाराने भारावून जाऊन एकत्र येउन होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देते. तेव्हाच क्रांती घडून येते.
निदान आतातरी हे अंधपणाने अनुयायी होणं, झेंडे घेऊन सभेला गर्दी करणं आपण थांबवणार आहोत का? आतातरी मुल्यांची, विकासाची लढाई आपण लढणार आहोत का? कुणाचीतरी चमचेगिरी करण्यापेक्षा, डोळसपणे समाजाच्या आणि पर्यायी स्वतःच्या विकासासाठी उभे राहणार आहोत का? हा सवाल आपण सर्वांनी स्वतःला विचारायची गरज आहे. आहे असं तर मला नक्कीच वाटते.
कुणाच्या वादात किंवा कुणाच्या नादात पडण्यापेक्षा उद्योगधंद्यात पडलं तर खूप प्रगती होईल असं मला नक्की वाटतं आपण सर्व मित्र परिवारांना माझ्या लेखन वाचल्यानंतर यावरती नक्की विचार करावा आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा, माझ्या सर्व बांधवांना नम्र विनंती आहे.
इंजि आशिष कानवडे
(संचालक-आशिष बिल्डकॉंन)
📞7028456005