ठळक बातम्या

बाबुर्डी घुमट गांव हे स्मार्ट व्हीलेज आणि आदर्श गांव होणार- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीहवामान बदलामुळे पावसात अनियमितता आली आहे. यासाठी हवामान अद्ययावत शेती करणे गरजेचे आहे. हवामान अद्ययावत शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे आहे. यासाठी बाबुर्डी घुमट गावामध्ये विद्यापीठ-खाजगी भागीदारीतून स्वंयचलीत हवामान केंद्र बसविण्यात आले असून त्याचबरोबर फुले इरीगेशन शेड्युलर ॲप आणि ऑटोमॅटीक पंप कंन्ट्रोलर शेतकर्यांना देण्यात आले आहे. यामुळे शेतकर्यांना त्यांच्या मोबाईलवर त्या दिवसाचे हवामान आणि त्यानुसार पिकांना किती वेळी पाणी द्यायचे याबाबत मोबाईलवर सूचना मिळेल आणि मोबाईलद्वारेच मोटर बंद चालू करणे शक्य होईल. हे गाव स्मार्ट तंत्रज्ञानाव्यतिरिक्त स्वयंपूर्ण कसे करता येईल याकडे आम्ही लक्ष देऊ. बांबुर्डी घुमट हे गाव स्मार्ट व्हीलेज आणि आदर्श गांव बनवून सर्व गावांसाठी एक मॉडेल व्हीलेज म्हणुन साकार करु असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.


महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना आणि सेवा स्वंयसेवी संस्था, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने बाबुर्डी घुमट गांवामध्ये स्वयंचलीत हवामान केंद्राचे उद्घाटन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. पाटील शेतकर्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.प.चे उपमहासंचालक डॉ. आर.सी. अग्रवाल, नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रभात कुमार, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख आणि कास्ट-कासम प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, मृद व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बापुसाहेब भाकरे, नियंत्रक श्री. विजय कोते, मेडाचे जनरल मॅनेजर श्री. हर्षल भास्करे, सहसमन्वयक डॉ. एम.जी. शिंदे, ग्रामसेविका सौ. निलीमा बनकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.


उपमहासंचालक डॉ. आर.सी. अग्रवाल मार्गदर्शन करतांना म्हणाले आत्मनिर्भर भारत करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा अचूकपणे वापर करणे गरजेचे आहे. डिजीटल तंत्रज्ञान शेतकरी आत्मसात करण्यास वेळ लागतो पण त्यात त्यांचा वेळ आणि पैसा वाचत असेल तर ते निश्चितच आत्मसात करतात. बाबुर्डी घुमट गाव हे हवामान अद्ययावत होत असल्याचा मला आनंद आहे. पण हे गांव कृषि विद्यापीठाने मॉडेल व्हीलेज म्हणुन बनवावे. हे गांव डिजीटल, स्मार्ट, हरित, स्वच्छ, सुंदर आणि सुदृढ गांव म्हणुन त्याची ओळख व्हावी. याप्रसंगी डॉ. प्रभात कुमार म्हणाले एकात्मिक डिजीटल तंत्रज्ञानाचा फायदा शेतकर्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचवतो हे बाबुर्डी घुमट या गावाने सिध्द केले आहे. यावेळी डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

याप्रसंगी स्वयंचलीत हवामान केंद्र, हवामान अंदाज दर्शविणारा डिजीटल फलकाचे उद्घाटन कुलगुरुंच्या हस्ते करण्यात आले. स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्यासाठी सेवा स्वयंसेवी संस्थेने आर्थिक सहाय्य दिल्याचे डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी सांगितले तसेच विद्यापीठ विकसीत फुले इरिगेशन शेड्युलर अॅप शेतकर्यांच्या मोबाईलमध्ये स्थापीत करण्यात आले आणि अॅटोमॅटीक पंप कंन्ट्रोलरचे वाटप शेतकर्यांना करण्यात आले. या एकात्मिक डिजीटल तंत्रज्ञानाचा डेमो भाऊसाहेब परभणे यांच्या शेतावर घेण्यात आला. यावेळी शेतकर्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवाजी परभणे, एकनाथ माने, रखमाजी मोरगे शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम.जी. शिंदे यांनी केले तर आभार जनार्धन माने यांनी मानले.

Related Articles

Back to top button