क्रीडा
शालेय जीवन,ग्रामीण भागातील तरुण व क्रीडा क्षेत्रातील संधी
ग्रामीण भागातील तरुणांना शालेय जीवनापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षण व मार्गदर्शन करणं गरजेचे आहे. मुलांचा व्यक्तिमत्व विकासाचे मुख्य मंदिर शाळाच आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजच्या धकाधकीच्या व स्पर्धात्मक युगात अनेक तरुण क्रीडा क्षेत्रात आपलं नशीब आजमावत असतात. परंतु योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शक न मिळाल्यामुळे क्रीडा क्षेत्रात त्यांना अपयश येत असतं. ऑलंपिक स्पर्धा झाल्यानंतर एखादा सहज बोलून जातो कि आपली लोकसंख्या एवढी जास्त असूनही आपण किती कमी पदकं मिळवली? व दुसरा खूप छोटा देश असूनही त्यांनी खूप पदकांची कमाई केली परंतु त्याला अनेक कारणे आहेत. काही होतकरू तरुणांकडे कौशल्य असूनही घरच्या गरिबीमुळे ते तिथपर्यंत पोहोचु शकत नाहीत व दुसरं सर्वात महत्वाचे कारण म्हणजे शालेय जीवनापासून क्रीडा क्षेत्रात मुलांना वाव देण्यासाठी आपण अपयशी ठरतो आहोत.
आपल्याला फक्त दहावी बारावीचा निकाल जास्तीत जास्त कसा लागेल हेच महत्वाचे असून मुलांना चार भिंतीच्या आत बसवुन पुस्तकी किडे बनविण्याचे काम आपण करतो. परिणामी मुलांचा सर्वांगीण विकास होतं नाही. वर्गातील एखादा मुलगा अभ्यासात हुशार नसेल पण खेळात मात्र तो पारंगत असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे पण दुर्देवाने तसं घडत नाही. कारण सर्वांचे टार्गेट फक्त शाळेचा निकाल जास्त लागला पाहिजे बाकी काहीच नाही. आज योग साधना, व्यायाम व विविध खेळ यातूनच पुढील सशक्त पिढी निर्माण होणार आहे हे लक्षात घेणं गरजेचे आहे. प्रत्येक शाळेत स्वतंत्र शिक्षक हा क्रीडा क्षेत्रासाठी का असु नये? सरकारने ही विविध क्रीडा क्षेत्रात पारंगत असलेल्या युवकांना मदत व संधी उपलब्ध करून देणं गरजेचे आहे.
बाळासाहेब भोर
( युवक अध्यक्ष, क्रांतीसेना, संगमनेर )