अहिल्यानगर
देवळाली प्रवरा हद्दीतील रस्त्याच्या प्रश्नावर बैठक संपन्न
देवळाली प्रवरा प्रतिनिधी : येथील गुंजाळ, घुले व शेटे वस्ती रस्त्याच्या प्रश्नावर चर्चा विनिमय करून मार्ग काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्या प्रमुख उपस्थितीत घुले वस्ती येथे बैठक संपन्न झाली.
आप्पासाहेब ढुस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या बैठकीस प्रशांत काळे, आण्णासाहेब शेटे, बाळासाहेब शेटे, रावसाहेब शेटे, चांगदेव शेटे, आप्पासाहेब शेटे, आकाश शेटे, सचिन जाधव, अनिल घुले, शिवाजी घुले, अमोल घुले, सुखदेव घुले, बाळासाहेब घुले, नानासाहेब घुले, ज्ञानदेव घुले, सुनील घुले, शांताबाई घुले, कोळसे, भाऊसाहेब शेटे आदी उपस्थित होते.
देवळाली प्रवरा नागरपरिषद हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर गुंजाळ नाका येथील गुंजाळ, घुले व शेटे वस्तीवर जाण्यासाठी असलेला कित्येक वर्षे जुना वहिवाटीचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. कित्येक वेळा अर्ज विनंत्या करूनही देवळाली प्रवरा नगरपालिकेने या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाहेर काढण्यासाठी अनंत अडचणी येत आहेत. तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा हा रस्ता म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा असाच आहे.
जवळपास दीडशे ते दोनशे लोकवस्ती असलेल्या या गुंजाळ, घुले व शेटे वस्तीवर जर कुणी आजारी पडले तर ऐनवेळी ना रुग्णवाहिका या ठिकाणी जाऊ शकते ना आग लागल्यावर अग्निशमन गाडी या वस्तीवर जाऊ शकणार आहे. त्यामुळे सर्वांना अर्ज विनंत्या करूनही या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने सर्वांच्या मदतीला धावून जाणारे देवळाली प्रवराचे सुपुत्र तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय येथील नागरिकांनी एकमताने निर्णय घेतला.
२९ ऑगस्ट रोजी घुले वस्ती येथे रात्री ८.३० वाजता आप्पासाहेब ढुस यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. त्यामध्ये या रस्त्याच्या प्रश्नावर साधक बाधक चर्चा होऊन कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्याचा वाद दोन्ही बाजूकडील नागरिकांनी एकत्र बसून सामोपचाराने मिटविणेचा प्राथमिक निर्णय घेण्यात आला.