छत्रपती संभाजीनगर
कौशल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश शुल्काचे फलक लावा – छावा विद्यार्थी क्रांतिवीर सेना
गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देताना छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी. |
पैठण : कौशल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यानां प्रवेश घेताना प्रवेश शुल्क किती याबाबतीत संभ्रम आहे. याकरिता सदर महाविद्यालयाने प्रवेश शुल्काचे फलक लावून विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्काची पावती द्यावी अशी मागणी छावा विद्यार्थी क्रांतिवीर सेनेतर्फे गटशिक्षणाधिकारी यांना नुकतीच निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती बघता फक्त राज्यावरच नव्हे, तर देशावर आर्थिक संकट आलेले आहे. स्थानिक पातळीवर छोट्या प्रमाणात असलेले उद्योग, शेतकरी, हातमजुरीवर घर चालवणारी मंडळी तसेच इतर सर्व क्षेत्रात काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसलेला आहे. या परिस्थितीमध्ये आपल्या महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना एकाच वेळी संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती केली जात आहे. शुल्क भरू न शकल्यास पुढच्या वर्गामध्ये प्रवेश मिळेल का नाही असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी मुदत वाढ करण्यात यावी किंवा काही टप्यामध्ये शुल्क भरण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि छावा क्रांतिवीर विद्यार्थी संघटनेद्वारे करण्यात येत आहे. महाविद्यालयातील ११ वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्का संदर्भात प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे. विद्यार्थी व पालकांना अडचणी निर्माण होत आहे. यासाठी महाविद्यालयाच्या आवारात संपूर्ण वर्ग व विषय शुल्काचा एक फलक लावावा. तसेच विद्यार्थ्यांच्या पावती बद्दल महाविद्यालयाच्या तक्रारी आलेल्या असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना प्रवेश पावती देण्यात यावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या हिताचा निर्णय घेण्यात यावा अन्यथा छावा क्रांतिवीर सेना मार्फत आपल्या कार्यालया समोर तीव्र स्वरूपाचे निर्दशने करण्यात येईल असा इशारा गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. यावेळी छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद बावणे, मनसे उपशहराध्यक्ष उमेश गोजरे, राकेश वाघे, कृष्णा मोरे, अविनाश पाटील, अविनाश काळे, गणेश गरड आदी उपस्थित होते.