गुन्हे वार्ता

नगर-मनमाड राज्य महामार्ग बनतोय अनैतिक व्यवसायाचा अड्डा, संयुक्त मोहिम राबवत निर्बंधाची मागणी

राहुरी/ बाळकृष्ण भोसले : नगर-मनमाड राज्य महामार्गावरील हॉटेल लॉजिंग सध्या अनैतिक व्यवसायाचे अड्डे बनत असल्याचे भयानक वास्तव समोर आले असून कोरोना काळात हॉटेल व्यवसायाचे आर्थिक कंबरडे मोडले असल्याने कमी श्रमात जास्त पैसे मिळविण्यासाठी या व्यावसायिकांनी असे क्षेत्र निवडल्याने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होणार आहे, हे चित्र बदलण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.
सध्या नगर- मनमाड राज्य महामार्गावर असंख्य ढाबे, हॉटेल व त्यालाच संलग्न दुरवरुन आलेल्या प्रवाशांच्या राहण्यासाठी लॉजिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. काही लॉजिंग व्यावसायिकांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांचा परवाना घेतला असून प्रवाशांना माफक दरात हे लॉजिंग देण्यात यावेत व त्यांची सुरक्षितता बाळगावी असे शासन धोरण आहे. या महामार्गावर शिर्डी व शिंगणापूर हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने देश व परदेशातील अनेक भाविक भक्तांची सध्या कोरोना महामारी घटल्याने तसेच निर्बंधांमध्ये शासनाने काहीशी सुट दिल्याने रेलचेल दिसून येत आहे. मात्र महामार्गालगत असलेल्या या हॉटेलमध्ये अजूनही शुकशुकाट आहे. मोठा खर्च करुन उभारण्यात आलेल्या हॉटेलचा दैनंदिन खर्च भागत नसल्याने यातील काही व्यावसायिकांनी वेगळाच फंडा अवलंबिल्याचे सद्यस्थितीत चित्र समोर येत आहे.
बियर-बारचा परवाना सर्रास ठिकाणी आढळून येत असल्याने यातून बनावट मद्य विकले जातेच सोबत लॉजिंगवर कोणतेही ओळखपत्र न घेता व नोंद न करता कुणालाही सहज प्रवेश देण्यात येत आहे. यात शाळा व महाविद्यालयीन मुलामुलींचा भरणा अधिक असल्याचे दिसत आहे तर वेश्याव्यवसायही सर्रासपणे सुरू असल्याचे वास्तव आहे. काही दिवसापूर्वी राहुरीचे तत्कालीन पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांनी याविरोधात जोरदार मोहीम हाती घेत या व्यावसायिकांना बऱ्याच अंशी आळा घालण्यात यश मिळविले होते तर राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसापुर्वी एका हॉटेलवर धाड मारत मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची तसेच बनावट दारु बनवून विक्री करत असलेल्या एका व्यावसायिकाला ताब्यात घेतले होते. मात्र यात सातत्य नसल्याने हे व्यवसाय आणखी तेजीत सुरू आहेत. लॉजिंगवर सहज प्रवेश मिळत असल्याने शाळेतील मुलामुलींची रेलचेल येथे दिसत असून मुले शाळेत गेल्याचे भासवून पालकांची नजर चुकवत ही मुले लॉजिंगवर आढळून येत आहेत. यात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलामुलींचा भरणा असल्याचे विदारक चित्र आहेे. यावर आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आपल्या अधिकाराचा वापर करण्याचे अधोरेखित होत आहे.
सोबतच रात्री -अपरात्री हॉटेललगतच्या महामार्गावर बँटऱ्यांचा प्रकाशझोत सर्रासपणे पहावयास मिळतो. यातून छोटेमोठे अपघातही घडले आहेत. पोलिसांनी यावर निर्बंध आणण्यासाठी वारंवार धाडसत्र घालून संबंधित व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र जेलवारी करून परत आल्यावर परिस्थिती जैसे थे होत आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत हे व्यवसाय तसेच व्यावसायिकांवर जरब बसविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.

Related Articles

Back to top button