प्रासंगिक

कट्टरतावाद, भावना आणि आजचा तरुण

कट्टरता म्हणजे समर्थक, एकनिष्ठ किंवा विशेष असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. तर कट्टरतावाद हा थोडक्यात भावनेचा खेळ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.कट्टरतावाद हे एक प्रकारचे व्यसनच आहे.आजचा तरुण त्यात गुरफटतो आहे.कुणी जातीसाठी कट्टर, कुणी धर्मासाठी, कुणी एखाद्या राजकीय पक्षासाठी कट्टर,कुणी नेत्यासाठी कट्टर, असाच काहीसा प्रकार सध्या आपल्याला बघायला मिळतो आहे.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, मूलभूत हक्क व अधिकारांच्या रक्षणासाठी कुणीही कट्टरतावादी भूमिका घेताना दिसत नाही हीच मोठी शोकांतिका आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी आपण कट्टर असावं पण दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही. आपण आपल्या मातीसाठी कट्टरवादी कधी होणार? अख्या जगाची खळगी भरणाऱ्या बळीराजाच्या प्रश्नांवर लढण्यासाठी आपण कट्टर कधी होणार? प्रत्येक नागरिकाला आपल्या जात, धर्म, वंश, भाषा,वेशभूषा, याचा अभिमान जरूर असावा पण इतरांचा तिरस्कारही नसावा. कट्टरतावाद हा दहशतवाद, अत्याचार, गुन्हेगारी, बेकारी यांच्या विरुद्ध लढण्यासाठी असावा कुणाच्या समर्थनार्थ नाही. कट्टरतावादी ही एक समाजाला लागलेली एक प्रकारची कीड, वाळवी आहे हे आजच्या तरुणांनी वेळेत लक्षात घेणं गरजेचे आहे. स्त्री – पुरुष समानता, शिक्षण, आरोग्य या सर्व बाबींच्या समर्थनार्थ कट्टर जरूर असावं. स्वावलंबन, स्वकर्तृत्व, जिद्द, चिकाटी, संघर्ष, त्याग, निष्ठा, नम्रता या नेतृत्वगुणांतुन आजच्या तरुणांनी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे.प्रत्येक नागरिक हा कायद्यासमोर समान आहे प्रत्येकाला मूलभूत हक्क, अधिकार दिलेले आहेत मात्र त्या मूलभूत हक्क अधिकारांचा वापर करताना नागरिकांनी मूलभूत कर्त्यव्याचेही पालन करणं गरजेचे आहे.शेवटी विविधतेतून एकता, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म समभाव, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा विचारच राष्ट्राला तारील यात तिळमात्र शंका नाही. 
 _बाळासाहेब भोर क्रांतीसेना, संगमनेर.)

Related Articles

Back to top button