गुन्हे वार्ता
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त करणार्या नराधमास कठोर शिक्षा देण्याची जन आधार सामाजिक संघटनेची मागणी
राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : नालेगाव येथील वाघ गल्लीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या नराधमास कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत अमोल भंडारे, गणेश निमसे, बंटी डापसे, श्रीपाद वाघमारे, संदीप तेलधुणे, दीपक गुगळे, सुशिल नहर, अमित गांधी, मच्छिंद्र गांगर्डे, संदीप वाघमारे, छाया नवले, वनिता बिडवे, प्रिया नवले, सुशीला सहानी, रेखा डोळस, स्वाती पवळे आदी उपस्थित होते.
नालेगाव वाघ गल्ली येथील अल्पवयीन मुलीवर 32 वर्षांच्या नराधमाने वेळोवेळी मानसिक व शारीरिक अत्याचार केला. अनेक वेळा त्याने मुलीचे कुटुंबीयांवर दबाव आणून लग्न करण्यासाठी भाग पाडले. परंतू सदर कुटुंब हे मोलमजुरी करणारे व अत्यंत गरीब परिस्थितीत हलाकीचे जीवन जगणारे आहे. तसेच मुलीने माझ्याशी लग्न केले नाही तर मी तिला जिवे मारून टाकील अश्या पद्धतीने त्याने तिला व तिच्या कुटुंबियांना अनेक वेळा धमकावले. या सर्व बाबीला कंटाळून मागील 10 ते 12 दिवसापूर्वी त्या मुलीने विष प्रशासन केले. त्यानंतर तिला उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले. तिच्या कुटुंबाची परिस्थिती नसल्यामुळे व हॉस्पिटलचे देयक पेलत नसल्याने तिला मागील काही दिवसापासून सरकारी जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले. परंतु तेथे तिचा उपचारादरम्यान 27 ऑक्टोबर 2021 रोजी मृत्यू झाला.
घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. मुलीचे व मुलाचे दोघांचे कॉल डिटेल तपासून आरोपीस कठोर शिक्षा द्यावी व सदर केस ही जलदगती कोर्टामध्ये चालवण्यात यावी. तसेच सदर आरोपी मुळे पीडितेच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याने त्याला केसचा निकाल लागेपर्यंत जामीन देऊ नये व पीडित अल्पवयीन कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे. या संपूर्ण कुटुंबाला निकाल लागेपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी जन आधार सामाजिक संघटनेने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.