दोन शेतमजूर महिलांवर दरोडेखोरांचा सामुहिक बलात्कार
विजय चिडे/पाचोड : पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात दोन शेतमजूर महिलांवर दरोडेखोरांनी सामूहिक पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बिहार राज्यातून मोलमजुरी करण्यासाठी आलेले हे दोन दाम्पत्य तोंडोळी गावातील शेतवस्तीवर राहत होते. मंगळवारी (ता.१९) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सात दरोडेखोरांनी शेतवस्तीवर दरोडा घालत दोन महिलांवर पाशवी बलात्कार केला. विशेष म्हणजे यातील एक महिला ही पंधरा दिवसांची बाळंतीण आहे तर दुसरी महिला ही आठ महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन महिलांवर तब्बल सात जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
ही घटना घडल्यानंतर औरंगाबादसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. घटना घडून गेल्यानंतर घटनास्थळाला वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. मात्र अजूनही पोलिसांना आरोपींचा मागमूस लागलेला नाही. जिल्हयातील पोलीस यंत्रणा येथे दाखल झाली असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. बिडकिन पोलीस ठाणेअंतर्गत ही घटना घडली असून जिल्हा पोलिस अधीक्षक निमित गोयल तळ ठोकून आहे.



