अहिल्यानगर

सात्रळ महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

राहुरी प्रतिनिधी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव महाविद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण चोरमुंगे पाटील, सदस्य रमेश पन्हाळे, जे. पी. जोर्वेकर, कारभारी ताठे पाटील उपस्थित होते. उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, कार्यालयीन अधिक्षक विलास शिंदे, महेंद्र तांबे, सर्व स्टाफ व सेवक वृंद यांच्या समवेत प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

      यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप म्हणाले की, कोविडच्या आणीबाणीच्या काळात भारतीय स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. आज भारत मातेसमोर अनेक अस्मानी-सुलतानी संकटे असली तरी जगाला कवेत घेण्याची क्षमता आमच्याकडे आहे. आम्ही वैश्विक बनण्याचा निर्धार केला आहे. आम्ही सृजनाच्या, नवनिर्माणाच्या नव्या दिशा शोधत आहोत. कृषी, उद्योग, व्यापार, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, संशोधन, संरक्षण इत्यादी असंख्य क्षेत्रातले आपले यश लक्षणीय आहे. सर्वार्थाने संपन्न, सुसज्ज आणि सुसंस्कृत देश अशी आपली जगात ओळख आहे. या मातीच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणाऱ्या महान वीरांच्या राष्ट्रभक्तीची आणि बलिदानाची जाणीव आपल्यात सदैव तेवत राहो. आजची तरुणाई क्रिऐटीव्ह आणि हुशार आहे. त्यांच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे. आपली शेती, उद्योग, कला, क्रीडा, शिक्षण आणि संस्कृती तरुण शक्तीच्या सामर्थ्याने बहरो.

महाविद्यालयातील मुलींनी राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन केले. प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक प्रा. हरिदास हजारे यांनी केले. आभार प्रा. श्रीकृष्ण लोंढे यांनी मानले. शारीरिक शिक्षण विभागातील प्रा. सुरेश अनाप व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button