अहिल्यानगर

थकीत एफआरपी रकमेसाठी स्वतंत्र क्रांतिकारी लोकसेवा संघाचे धरणे आंदोलन.

श्रीगोंदा प्रतिनिधी : तालुक्यातील चारही कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे राहिलेले एफआरपीप्रमाणे पेमेंट तातडीने अदा करावे व एफआरपीच्या राहिलेल्या रक्कमेवर व्याज द्यावे. कारखान्यांनी वाढवलेली सभासदांच्या शेअर्सची रक्कम सभासदांकडून न घेता कारखान्याकडे सभासदांच्या असणाऱ्या ठेवींवरील व्याजातून कपात करावी. साखर कारखान्यांनी कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आरोग्य विमा मेडीक्लेम उतरावावे. मगासवर्गीय समाजातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत सभासद करावे या  व इतर मागण्यांसाठी क्रांतिदिनी स्वतंत्र क्रांतिकारी लोकसेवा संघाच्या वतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

      यावेळी भाजपचे नेते राजेंद्र म्हस्के म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रपंच्याशी खेळत असलेला खेळ साखर कारखानदारांनी थांबवावा व लवकर एफआरपी प्रमाणे पेमेंट जमा करावे अन्यथा सहकारमंत्री यांच्या दालनात जाऊन उपोषण करणार आहोत. जर तिथेही न्याय भेटला नाही तर कोर्टात जाऊन कारखान्याचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर म्हणाले की, कोरोणा महामारीमुळे शेतकरी वर्ग अतिशय अडचणीत आला आहे. तरी कारखानदारांनी हि गोष्ट गांभीर्याने घेऊन एफआरपी प्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ म्हणाले की, मागासवर्गीय समाजातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत सभासद करावे अथवा त्यांच्या शेअर्सची रक्कम कारखानदारांनी भरावी. संतोष इथापे म्हणाले की, जर आमच्या मागण्यांना न्याय भेटला नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आगामी काळात करणार आहोत.

यावेळी सुभाष दरेकर, टिळक भोस, माऊली मोटे, विक्रम शेळके, भाऊसाहेब मांडे, नंदुकुमार ताडे, बळीराम बोडखे, राजेंद्र नागवडे, कांतीलाल कोकाटे, प्रदिप खामगळ, नंदु ससाणे, संतोष शिंदे, अक्षय वागस्कर, महादेव म्हस्के, शिवराज ताडे आदी मान्यवर उपस्थित होते. आंदोलनाच्या दरम्यान च्या काळात महाराष्ट्र साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार,नागवडे कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन केशव मगर यांनी भेट देऊन पाठींबा दिला.

Related Articles

Back to top button