कॉलेज कट्टा
कॉलेज कट्टा- भाग ५४
“इन्फॉर्मेशन ऑन फिंगर टीप”!
असे म्हणता म्हणता आपण हळूहळू सोशल मीडिया कडे वळलो. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर आपण सगळ्यांनीच अनुभवला वा पाहिला आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा कोवीडची साथ सुरू झाली, तेव्हा सोशल मीडियाचा सकारात्मक वापर या दृष्टीने आपण सगळेच जागृत झालो. आजचा कट्टा आहे सोशल मीडिया सकारात्मक कट्टा.
गुगल किंवा तत्सम सर्च इंजिनच्या मदतीने आपण वाट्टेल ती माहिती सुरुवातीला कॉम्प्युटरवर, मग लॅपटॉप आणि आता मोबाईलवर मिळते…
… याच माहितीचं ज्ञानात रूपांतर करणं सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज शक्य झाले आहे. कु सारखी ॲप , प्रतिलिपि सारखी, किंवा तस्तम ॲप किंवा कन्टेन्ट असणारी ॲप ने तर आपल्याकडे केवढा बदल केला आहे. खान अकॅडमी, कोर्सएरा, बायजू, कोटस असेल या सगळ्यांनी ज्ञानामध्ये, ज्ञाननिर्मिती मध्ये मोठी प्रगती केली आहे. त्याबरोबर येतात त्या सोशल मेडिया साइट्स, व्हाट्सअप चा उपयोग चांगल्या कामासाठी सुद्धा करता येतो. आपल्या प्रत्येक महाविद्यालयांमध्ये वर्गनिहाय ग्रुप आहेत याचा अतिशय सकारात्मक उपयोग करणारी मंडळी आहेत. रवी घाटे हे माझे मित्र आहेत एसएमएस सेवा नावाने 15 वर्षांपूर्वी सुरू केली होती. एस एम एस चे वैशिष्ट्य असते की तो वाचल्याशिवाय माणूस डिलीट करत नाही. तसं व्हॉट्स ॲप वर होत नाही. बऱ्याच वेळा पिक्चर/चित्र डाऊनलोड न करता ती डिलिट करण्याकडे एक मानसिकता असते. कारण प्रत्येकाला आपला दीड वा दोन जीबी डाटा संपू नये असं वाटतं. मग या सोशल मीडियाचा चांगल्यासाठी वापर करता येईल का? तर नक्कीच करता येईल.
व्हाट्सअप कॉलिंग वरून सुरुवातीच्या काळात काही लोकांनी लेक्चरस केली. मग आली ती झूम, टीम, गुगल मीट किंवा तत्सम सेमिनार घेता येणारी ॲप्स. या माध्यमातून सुद्धा शिक्षण झाले. माझे एक प्राचार्य मित्र आहेत की ज्यांच्याकडे व्हाट्सअप नाही. त्यांनी सुरूच केले नाही. ते असे म्हणतात की माझे त्या वाचून काहीच अडत नाही.
आपण सगळ्यांनी जर फक्त ज्ञान निर्मितीसाठी किंवा ज्ञान प्रसारासाठी व्हाट्सअप अर्थात सोशल मीडियाचा वापर केला आणि ते करणे शक्य आहे तर क्रांती होऊ शकते. मी गेल्या काही वर्षांपासून एक तत्व पाळतो आहे आणि ते म्हणजे कुठलीही पोस्ट दुसऱ्याची फॉरवर्ड करायची नाही, जोपर्यंत ती अत्यंत महत्त्वाची वाटत नाही.
व्हाट्सअप चा वापर करून झूम च्या मीटिंग आपण अनेकांनी घेतल्या. खूप वेळ वाचला. म्हणजे आमच्या विद्यापीठात दोन वर्षापैकी अनेक मीटिंग अनेक सभा या ऑनलाईन झाल्या. म्हणजे इतक्या लोकांचा प्रवास वाचला. ऑनलाइन शिक्षणाचे तोटे आहेत. मान्य पण फायदे पण आहेत. आपण सगळ्यांनी मन लावून जर शिकलं तर शक्य आहे. अर्थात वर्गात बसूनही आपल्यापैकी किती जण शिकतात, ज्ञानग्रहण करतात हा चिंतेचा विषय आहे, हा चर्चेचा विषय आहे. आपण या बाबतीत सतर्क राहिले पाहिजे. मागे एकदा मी स्विच ऑन आणि स्विच ऑफ अशी कन्सेप्ट मांडली होती, म्हणजे जेव्हा सोशल मीडिया वापरायचं. त्याच वेळी तेही फक्त ठराविक वेळेला. सोशल मीडियामुळे अनेक फायदे झालेले आपण पाहिलेले आहेत. जसे माहितीची देवाण-घेवाण अत्यंत फास्ट होते. अनेक जणांना मदत होते. कोणाला रक्त लागत असेल, एखाद्याला नोकरी हवी असेल; एखाद्या चा अपघात झाला असेल; त्याला मदत हवी असेल, अर्जंट कुठे पैसे हवे असतील या सगळ्यामधनं सोशल मीडिया अत्यंत सकारात्मक वापरता येतो. चाळीस चाळीस वर्षे न भेटलेली माणसं पुन्हा भेटायला लागली. पंधरा-वीस वर्षात ज्यांचा कधीही कार्यबाहुल्यामुळे संबंध आला नव्हता, ती माणसं सोशल मीडियामुळे भेटायला लागली. हा सगळा सकारात्मक परिणाम सोशल मीडियाचा नक्कीच आहे.
दुसऱ्याच्या चांगल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला कळायला लागल्या. माझे काही प्राचार्य मित्र आहेत. सातत्याने त्यांच्या ॲक्टिव्हिटी फेसबुक वर आणि एकूणच सोशल मिडीयावर टाकतात. त्यात प्रामुख्याने डॉ. नितीन घोरपडे, डॉ, रंगनाथ आहेर किंवा डॉ. अन्वर शेख, डॉ. मोहन वामन, डॉ काकासाहेब मोहिते, डॉ महेंद्र कदम, व अजून काही… त्यात मीही आहेच. हे प्राचार्य सोशल मीडियाचा अत्यंत सकारात्मक उपयोग करतात ( काहीजण त्यांना ही गोष्ट आवडत नसल्याचे आवर्जून सांगतात ). प्रत्येक छोटी-मोठी महाविद्यालयात घडलेली घटना ही सोशल मीडियावर आल्याने ती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. इतर महाविद्यालयात अशा ॲक्टिविटी राबवता येतात. ज्या खडकी महाविद्यालयात नुकतीच पाच चर्चासत्रे झाली. कागदावर पत्रिका न छापता केवळ सोशल मीडियावर अतिशय चांगला प्रतिसाद भारतभरातून त्याला मिळाला.
सकारात्मक उपयोग सोशल मीडियाचा होऊ शकतो. इंस्टाग्राम, टिक टॉक किंवा ट्विटर हँडलचा उपयोग सकारात्मक दृष्टीने करता येतो. एखाद्याच्या यश अपयश किंवा दुःखद वार्ता या सोशल मीडिया मधून कळल्यामुळे, सुखामध्ये सहभागी होण्यासाठी, याचा चांगला फायदा होतो. सृजनात्मक साहित्य निर्मिती करून ती लोकांपर्यंत पोचवणे. आपली मनाची घालमेल, मनाचा कळवळा, मनातली कालवाकालव थोडक्यात काय मनाची बुज साहित्य निर्माण करून लोकांपर्यंत पोचवता येते. ये मनीचे ते मनी पोहोचवणे हा यामागचा दृष्टिकोन अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो, आणि म्हणून एकूण काय तर विस्ताराने सांगण्याची आवश्यकता नाही. सोशल मीडियाचा अतिशय सकारात्मक वापर आपण करू शकतो. सोशल मीडियाचा वापर वाईट केल्याने अनेकांवर सायबर गुन्हे दाखल झालेले आहेत. जी बाब अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ठराविक वेळा ठराविक साच्यात सोशल मीडिया पॉझिटिव्हली वापरता येऊ शकते.
ज्यामधून माहितीचे रुपांतर ज्ञानामध्ये आणि ज्ञानाचे रूपांतर संशोधनामध्ये करण्यासाठी उपयोग होतो. एखाद्या मुलाने जिरेनियम किंवा तत्सम शेती केली असेल आणि तो त्याचे प्रयोग फेसबुक वर टाकत असेल तर ती इतरांना प्रेरणा होऊ शकते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने तर सोशल मीडियाचा अत्यंत चांगला वापर होऊ शकतो. आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा सोशल मीडिया अत्यंत प्रभावी माध्यम ठरू शकते. सांगली पुराच्या वेळेस किंवा आत्ता कोकणातल्या पुराच्या वेळेस सोशल मीडियाचा अत्यंत चांगला वापर झाला. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. अनेक जणांना या माध्यमातून मदत करता आली आहे. कोणी अडचणीत असेल तर त्याला या अडचणीत बाहेरही काढता येते. त्यामुळे सोशल मीडिया सकारात्मक दृष्टीने घेऊयात.
काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्याने फालतू मालिका बघूच नका असे आवाहन केले. सोशल मीडियात तसे केलं पाहिजे असे मला वाटते. सकारात्मकतेने घ्यायला हवं की आपण मालिकांमधून नक्की काय मिळवतो. त्याऐवजी साहित्य वाचलं तर अनुभव सिद्ध होता येते. साहित्यनिर्मिती केली तर, लेखक होत आहेत. बरीचशी ॲप्स किंवा डेव्हलपमेंट करणारी ॲप्स उपलब्ध आहेत त्यातून पैसे पण मिळवता येऊ शकतात.
सोशल मीडियाचा वापर सकारात्मक करुयात!!!
सकारात्मक करण्यासाठी भाग पाडूया…
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य, शेठ टीकाराम जगन्नाथ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खडकी.
माजी सदस्य, अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे