कॉलेज कट्टा
कॉलेज कट्टा – भाग ५५
महाविद्यालयांमधून महापुरुषांना मानणारा मोठा विद्यार्थी गट असतो. आजचा आपला चर्चेचा विषय महापुरुष समर्पित कट्टा.
आपला महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र हा शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचा म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,… सर्वच महापुरुष. महाराष्ट्र सर्व महापुरुषांना प्रचंड मान देत आलेला आहे. सर्व महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेत पुढे जात राहिले पाहिजे. पण कधीकधी काही विद्यार्थी व त्यांचे काही मार्गदर्शक, महापुरुषांपेक्षा महापुरुषांच्या जातींना जास्त किंमत देतात. महापुरुषांची जयंती साजरी करणे किंवा पुण्यतिथीस अभिवादन एव्हढीच धन्यता मानतात…
कुसुमाग्रजांची एक अतिशय गाजलेली काव्य रचना आहे.
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले,
शेवटी मी झालो
फक्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले,
मी फक्त मराठ्यांचा.
आंबेडकर म्हणाले,
मी फक्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले,
मी तर फक्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
– कुसुमाग्रज
वास्तविक महापुरुष कुठल्याही जातीचे धर्माचे वा समुहाचे कधीच नसतात. ते विचार देणारे असतात. विचार हे क्रांतिकारी असतात, ते आपल्याला अमलात आणण्यासाठी. आपल्याला कणाकणानी हे विचारधन वेचावं लागतं. आणि म्हणून प्रत्येक महापुरुषांच्या विचारांचा कण तरी आपल्या अंगात भिनावा लागतो. एक तरी ओवी अनुभवावी. असे म्हणतात की, गाथेतील किंवा ज्ञानेश्वरी मधील एखादी ओवी जरी अनुभवायला मिळाली तरी खूप मोठी गोष्ट. महापुरुषांच्या लेखी आपण किती लहान असतो. त्यांची बरोबरी आपण करू शकत नाही. पण तरीसुद्धा आचारांपेक्षा विचारांना महत्त्व दिलं तर, ते जास्त योग्य होईल. अर्थात महापुरुषांनी त्या त्या काळात त्यांचे विचार त्या त्या प्रसंगानुरूप मांडलेले असतात. आपल्याला ते समजून घेता आले पाहिजेत.
एकदा काही मुलं माझ्याकडे आली, आणि म्हणाली, की “सर आम्हाला शिवजयंती साजरी करायची आहे.” पंधरा एक दिवसाचा अवधी होता मी म्हणालो, ” नक्की करूया.” त्यांच्या कल्पना नेहमीप्रमाणे होत्या,….. म्हणून “आपण राजगडावर जाऊन शिवजयंती साजरी करू”!! असा प्रस्ताव मी मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानीचा गड आणि आपण सायकलवर गडावर जाऊ या!!! , आणि म्हणता म्हणता १५० मुलं-मुली, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असे आम्ही राजगडला गेलो. शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारीला त्या काळात आम्ही गेलो. अर्थात पुढे पायंडाच पडला दर शिवजयंतीला सायकलवर कुठल्या न कुठल्या गडावर जायचे एकदा तर आम्ही पाच हजार लोक राजगडावर गेलो होतो. स्वतः संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील साहेब हे गडावर आले होते. अर्थात जी मुलं विचारायला आली होती त्यांच्यापैकी कुणीही आले नाही हे सांगणे न लगे…
महापुरुषांना जातीच्या पलीकडे बघायला शिकले पाहिजे. त्यांचे विचार, आचरणात आणण्यासाठी त्यांच्यावर लिहिले गेलेले साहित्य प्रचंड मोठ्या प्रमाणात वाचले गेले पाहिजे. धनंजय कीर यांनी लिहिलेली महापुरुषांची चरित्र हा एक उत्तम ठेवा ठरावा. समग्र महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली अनेक पुस्तकं अगदी ग्रँड डफ पासून वा. सी. बेंद्रे यांनी लिहिलेले खंड, गजानन मेहेंदळे यांनी किंवा बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले वा श्रीमान योगी, अनंत लिखाण शिवाजी महाराजांवर झाले आहे. गडांवर अनेक लिखाण झाले आहे. वास्तविक महाराजांची एक एक लढाई ही खूप काही शिकवून जाते. ते मॅनेजमेंट गुरु तर होतेच परंतु सर्वसमावेशक होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले, मूकनायक बहिष्कृत भारत, बुद्ध आणि त्याचा धम्म, किंवा बाबासाहेबांवर लिहिलेले अनेक खंड. असे किती तरी वाचता येईल. वाचून मग आपले विचार प्रेरित करता येतील. त्या दृष्टीने आपल्याला शिकता येईल. बाबासाहेबांसारखा 16 _16 तास अभ्यास करता येईल. त्यांच्यासारखे पुस्तकांसाठी घर करता येईल… अण्णा भाऊंसारखे प्रचंड लिखाण करता येईल. शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मासाठी वसतिगृह उघडली. सगळं काम या छोट्या लेखात सांगणे केवळ अशक्य.
महात्मा फुले यांचा समतावाद समतेचे धडे, आपल्याला घेता आले पाहिजे. सर्वसमावेशक कोणीही वर्ज्य असता कामा नये. सर्व जाती धर्मासाठी हे सगळं करून घेता येत. त्यासाठी समग्र फुले वाचायला हवे.
आपण महापुरुषांना वाटून तर घेत नाही ना ? ते होऊ नये ! म्हणून खरं तर हा लेखन प्रपंच !!!
चला तर;
महापुरुषांना आपलेसे करूया !!!
महापुरुषांचे अंश होऊयात !!!
महापुरुषांचे विचार अंगी बानुया !!!
त्यांच्या विचारांचे पाईक होऊयात !!!
धन्यवाद!!
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य, टी जे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खडकी.
माजी सदस्य, अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.