साहित्य व संस्कृती
रसाळगुरूजींचे ‘घडता घडता’ आत्मचरित्र रसाळतेचा अनुभव देते – डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : कुंभार समाजातील संगमनेर येथील सेवाभावी साहित्यिक दत्तात्रय सावळेराम रसाळगुरुजींचे ‘घडता घडता’ हे आत्मचरित्र वाड्मयीन दृष्टीने आणि सामाजिक अंगाने रसाळतेचा उत्कट अनुभव देणारे आहे, असे मत साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दत्तात्रय रसाळगुरुजी यांच्या ‘घडता घडता’ या आत्मचरित्रावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी बीएड. कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे होते. संत गोरा कुंभार सेवाभावी मंचचे कार्याध्यक्ष नितीन जोर्वेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी संवत्सरचे कुंभार समाजाचे कार्यकर्ते दिलीप गायकवाड, सौ.शांताताई गायकवाड, संगमनेर येथील भारत गवळी, बबनराव गायकवाड, मंगळापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई उपाध्ये, वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी उपाध्ये, सौ. माधुरी जोर्वेकर आदी उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या मनोगतात पुढे सांगितले की, कुंभार समाजातील साहित्यनिर्मिती आणि वाचन संस्कृती वाढविणे ही काळाची गरज आहे. रसाळगुरुजी यांनी अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले, शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे सेवा केली. आई भागीरथी आणि वडील सावळेराम यांनी कुंभारकाम करीत दत्तात्रय रसाळ यांना शिक्षण दिले, त्यांना 01 सप्टेंबर 1953 रोजी शिक्षकाची नोकरी मिळाली, त्यावेळी त्यांचे वय 16 वर्षाचे होते. 1993 साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, या काळात त्यांनी परिवाराला दिलेला अर्थ आणि आकार, तसेच परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचारला वाहून घेत स्वाध्याय परिवारात केलेले सेवाभावी कार्य या सर्वांचा स्वात्विक प्रत्यय देणारे ‘घडता घडता’ हे आत्मचरित्र आहे, असे लेखन समाजातील जाणकारांनी करावे असे आवाहन डॉ. उपाध्ये यांनी केले.
रसाळगुरुजी यांनी स्वाध्याय परिवार आणि मनाची जडणघडण सांगताना आपली कौटुंबिक जडणघडण विशद केली. कुंभार समाजाची प्रगती शिक्षणामुळे होत आहे. आता आपण 86 वर्षाचे असलो तरी समाजासाठी काम करीत अजूनही लेखन करणार आहोत असे सांगून वाचन संस्कृती प्रतिष्ठानने आपल्या आत्मचरित्रावर परिसंवाद घेऊन मनमोकळी चर्चा केली, वाचन केले आणि स्वाध्याय परिवारचे प्राचार्य डॉ. गागरे यांनी मनमोकळी प्रबोधक चर्चा केली त्याबद्दल समाधान व्यक्त केले, असे साहित्य वातावरण श्रीरामपूरला आहे हे प्रेरणादायी आहे. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ गागरे यांनी ‘घडता घडता’ अशी आत्मचरित्रे ही सामाजिक जाणिवेचे प्रांजळ तीर्थस्थळे असतात कारण त्यातूनच आपणास चांगला मार्ग सापडतो, आपणही आता आत्मचरित्र पूर्ण करणार असल्याचे डॉ. गागरे यांनी सांगितले. दिलीप गायकवाड, भारत गवळी यांनी चर्चेत भाग घेतला. सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी आभार मानले.