हरेगावमध्ये खा. सुजय विखे यांच्या शुभहस्ते 601 घरकुल योजनेचा शुभारंभ
बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वितरण

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : तालुक्यातील हरेगाव ग्रामपंचायतीस मंजूर झालेल्या 601 घरकुल योजनेचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा खा. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते शेती महामंडळ कार्यालय पाठीमागील हरेगाव–ब्राह्मणगाव रोड येथे संपन्न झाला. यावेळी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप देखील करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना खा. सुजय विखे म्हणाले, “हरेगावसह श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना गेली अनेक वर्षे विविध प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागत होता. घरकुल योजना, पुतळे, विकासकामे अशा प्रत्येक मागणीसाठी आंदोलन करावे लागले. अनेक वर्ष संधी मिळूनही स्थानिक नेतृत्वाने हे प्रश्न मार्गी लावले नाहीत. त्यामुळेच जनतेच्या विश्वासाने आम्ही पुढाकार घेत आहोत.”
ते पुढे म्हणाले, “आजपर्यंत तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींना घरकुलांसाठी जमीन देण्यात आली असून, आजही 10 कोटी रुपयांची जमीन मोफत देण्यात आली आहे. शिर्डी येथे नुकतेच 200 कोटी रुपयांची जमीन 300 लाभार्थींना वाटप केल्यानंतर हरेगावला आलो आहे. पुढील चार वर्षांत श्रीरामपूर तालुक्यातील एकही विकासप्रश्न प्रलंबित राहू देणार नाही.”
खा. विखे यांनी पुढे सांगितले, “40 वर्षे प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न फक्त सहा महिन्यात मार्गी लावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकरिता दीड कोटी रुपयांची तरतूद करून तो प्रश्नही निकाली काढला आहे.” तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने महायुतीसोबत राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत माजी सरपंच दिलीप त्रिभुवन यांनी केले. भाऊसाहेब बांद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भूमिका रमेश भालेराव यांनी पार पाडली.
यावेळी माजी सभापती दीपक पटारे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, अनिल भनगडे, दिलीप त्रिभुवन, रमेश भालेराव, भाऊसाहेब बांद्रे, डॉ. शंकरराव मुठे, गिरीधर आसने, शरद नवले, बाबासाहेब चिडे, गणेशराव मुदगुले, नानासाहेब शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.



