अतिवृष्टीने हिरडगावात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पंचनामे सुरू

श्रीगोंदा – तालुक्यातील हिरडगाव गावात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. खरीप हंगामात मेहनतीने वाढविलेली पिके मुसळधार पावसामुळे पाण्यात गेली असून कांदा, कपाशी, सोयाबीन, आणि तुर या महत्त्वाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हिरडगावच्या भागातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आशेने शेतीची कामे करून मोठ्या प्रमाणात खर्च केला. अनेक शेतकऱ्यांनी यंदा पीक उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक पद्धती वापरल्या. सप्टेंबर महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या.
पिकांचे झालेले नुकसान पाहता प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या असून आज पंचनाम्याचे काम करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विद्याताई बनकर, उपसरपंच अमोल दरेकर, ग्रामविकास अधिकारी भानुसे मॅडम आणि तलाठी गोरे भाऊसाहेब यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. विविध शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानाची नोंद घेण्यात आली.
या नुकसानीमुळे शेतकरी फारच निराश झाले असून शासनाने नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी ते करत आहेत. काही ठिकाणी पिके पूर्णतः नष्ट झाली असून शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. नुकसानीचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर त्याचा परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत, शासनाने वेळीच मदतीचा हात दिल्यास शेतकरी पुन्हा नव्याने उभे राहू शकतो.