नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्ग ठरत आहे अपघातांचा महामार्ग; २५ हजारांहून अधिक बळी, प्रशासनाविरोधात जनक्षोभ

राहुरी प्रतिनिधी : नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० गेल्या तीन दशकांपासून अपघातांचा महामार्ग ठरत असून आतापर्यंत २५ हजारांहून अधिक निरपराध नागरिकांना प्राणास मुकावे लागले आहे. तब्बल १७०० कोटी रुपयांचा खर्च करूनही रस्ता मूळ स्वरूपात तयार न झाल्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोषी ठेकेदार, संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत या महामार्गावर अनेक भीषण अपघातांनी नागरिकांचे जीव घेतले असून ९ नोव्हेंबर २०२० रोजी येवला तालुक्यातील सावरगाव येथे स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. १७ डिसेंबर २०२४ रोजी राहुरी तालुक्यातील चिंचोली फाट्यावर शालेय बस उलटून प्रवासी विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ६ जानेवारी २०२५ रोजी मनमाड बाजार समितीसमोर भरधाव ट्रकने दोन शालेय मुलांना ठार केले. मे २०२२ मध्ये राहुरी तालुक्यातील गुहाफाट्याजवळ कंटेनर व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत ३ जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. अशा शेकडो घटनांवर वेळोवेळी स्थानिक वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या असल्या तरीही प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अपघातांचा थैमान थांबत नसल्याचे चित्र आहे.
महामार्गावरील ४५ अपघात प्रवण ठिकाणी आजवर सव्वादोन हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या अपघातांची आकडेवारी भयावह आहे. एकूण ४८९७ अपघात, त्यापैकी २११३ भीषण ठरले. जुलै २०२५ महिन्यातच १४२ अपघात, ७० जणांचा मृत्यू. फक्त अहिल्यानगर – शिर्डी मार्गावर अडीच वर्षांत ३०२ अपघात, ३२२ मृत्यू. साईड पट्ट्यांची दुरावस्था, धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलकांचा अभाव, रस्ता सुरक्षा समिती केवळ कागदावर अस्तित्वात असल्यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये दुचाकीस्वार आणि पादचारी हे सर्वाधिक बळी ठरत आहेत.
गेल्या आठवड्यातील अपघातात चार निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. कुटुंबातील कमावते सदस्य किंवा शालेय मुले गमावल्यानंतर “नगर–मनमाड महामार्ग आणखी किती बळी घेणार?” हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात घर करून बसला आहे.
अहिल्यानगर–कोपरगाव महामार्गाची तात्काळ दुरुस्ती, दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे, सर्व धोकादायक वळणांवर मोठ्या आकाराचे व रंगीत दिशादर्शक फलक उभारणे, अपघातस्थळी पोलिसांची सतत उपस्थिती ठेवून तातडीने मदतकार्य, मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई, दोषी ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी–कर्मचारी तसेच जबाबदार लोकप्रतिनिधींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे थैमान नागरिकांच्या जीवाशी रोज खेळ करत आहे. आता तरी शासन व प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर लोकशक्तीच्या जोरावर मोठ्या प्रमाणावर आंदोलने उभी राहतील, हे निश्चित असल्याचे म्हटले आहे.