पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड गरजेची – कुलगुरु डॉ. शरद गडाख
महात्मा फुले कृषि विद्यापीठात वनमहोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा

राहुरी विद्यापीठ – वनमहोत्सवामध्ये शासनाच्या हिरवे आणि शाश्वत महाराष्ट्र या धोरणानुसार महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात 50 हजाराच्या वर वृक्षरोपण करण्यात येणार आहे. वृक्षलागवड केल्याने पर्यावरणातील हवा शुध्द होते, मातीची धुप थांबते, पाणी आडल्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढते, वातावरणातील तापमान कमी होते, जैवविविधता वाढते यामुळे पयावरणाचे संतुलन राहण्यासाठी मदत होते. यासाठी वृक्षलागवड करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील मध्यवर्ती परिसरामध्ये वनमहोत्सव-2025 च्या महाराष्ट्र शासनाच्या हिरवे आणि शाश्वत महाराष्ट्र या धोरणानुसार वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या शुभहस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, कृषि तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, मृदाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भिमराव कांबळे, आंतरविद्याशाखा जलव्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नितीन दानवले व कुलगुरुंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल उपस्थित होते.
प्रास्ताविक करतांना डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले की आज मध्यवर्ती परिसरातील उद्यानविद्या विभागांतर्गत टेकडी ब्लॉकमध्ये 550 व बियाणे विभागाच्या ब प्रक्षेत्रावर 850 आंबा झाडांची लागवड करण्यात आली आहे. कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात वनमहोत्सव सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत 5,56,000 वृक्ष लागवड झालेली आहे. यावर्षीच्या वनमहोत्सवाचा वृक्षरोपनाची संख्या धरुन 6,06,000 च्या वर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये लागवड झालेली आहे. विद्यापीठातील मध्यवर्ती परिसरात या वनमहोत्सावात 15,000 वृक्षांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आभार डॉ. भगवान देशमुख यांनी मानले.