जगाला शांती, प्रेम व दयेचा संदेश देऊ या – फा. भाऊसाहेब संसारे
हरिगाव : संत तेरेजा चर्चमधील मतमाउली यात्रेची भक्तिपूर्ण सुरूवात

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – हरिगाव येथील संत तेरेजा चर्चमधील मतमाउली भक्तिस्थानात दरवर्षीप्रमाणे मोठ्या भक्तिभावाने मतमाउली यात्रा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदा या यात्रेची सुरुवात ५ जुलै रोजी पहिल्या शनिवारी नोव्हेना भक्तीने झाली. यावेळी पवित्र मरिया मूर्तीची भाविकांच्या समवेत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत हरिगावचे प्रमुख धर्मगुरु फा. डॉमनिक रोझारिओ, फा. फ्रान्सिस ओहोळ, फा. संतान रॉड्रीग्ज, ब्रदर मक्सवेल, तसेच ज्ञानमाउली चर्च नेवासा, होली स्पिरीट चर्च शेवगाव, भक्ती निवास चर्च शेवगाव येथील धर्मगुरु व अनेक भाविक सहभागी झाले होते.
पहिल्या नोव्हेना दिवशी ‘पवित्र मरिया – दयाळू कुमारी’ या विषयावर प्रवचन झाले. यावेळी फा. भाऊसाहेब संसारे यांनी सांगितले, “परमेश्वराने आपल्याला जन्म देऊन अनमोल गिफ्ट्स दिल्या आहेत – प्रेम, दया, क्षमा. या देणग्यांचा उपयोग करणे, लोकांमध्ये प्रेम पसरवणे, दया दाखवणे, हेच आपले खरे जीवनधर्म आहे. जगाला आज शांती आणि प्रेमाची गरज आहे. आपण आपले जीवन शांतीने जगावे, क्षमा करावी, दया दाखवावी. ही शिकवण पवित्र मरियेकडून आपण घ्यावी.”
त्या दिवशी विशेषतः चिल्ड्रन्स ऑफ मदर मेरी ग्रुप च्या पुढाकाराने, प्रमुख धर्मगुरु डॉमनिक रोझारिओ, सर्व धर्मगुरु आणि पत्रकार बी. आर. चेडे यांच्या हस्ते दफन भूमीत वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला.
येत्या दुसऱ्या शनिवारी, १२ जुलै रोजी ‘पवित्र मरिया – रोग्यांच्या आरोग्या’ या विषयावर संत फ्रान्सिस चर्च मनमाड, होली फॅमिली चर्च कोपरगाव, रोझरी चर्च कोळपेवाडी येथील धर्मगुरू प्रवचन करतील. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना अधिकाधिक भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हरिगाव प्रमुख धर्मगुरु फा. डॉमनिक रोझारिओ यांनी केले आहे.