बाबासाहेब चेडे यांचे कार्य व व्यक्तिमत्त्व सेवाभावी- डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर : पत्रकारिता आणि फोटोग्राफी ही नव्या तंत्रयुगात काहीशी दुर्लक्षित होत असलेली कला असली तरी गेल्या ५० वर्षांपासून या व्यवसायातून आपली सेवा ग्रामीण भागात सुरू ठेवणारे बाबासाहेब चेडे यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व सेवाभावी असल्याचे मत वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माऊली वृद्धाश्रमात बाबासाहेब चेडे यांचा सेवाशील कार्यगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शंकरराव अनारसे होते. यावेळी माजी प्राचार्य शंकरराव अनारसे, माजी तहसिलदार गुलाबराव पादीर, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, माजी प्राचार्य टी.ई. शेळके, डॉ. शिवाजी काळे, डॉ. मदन सोमाणी, प्रा.सौ. मंजिरी सोमाणी, सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे, डॉ. भास्कर निफाडे, शंकरराव जोर्वेकर, बाबासाहेब बनकर पाटील, संतकवी एकनाथ डांगे पाटील आदिंनी बाबासाहेब चेडे यांच्या अमृतमहोत्सवी जीवनवाटचाली बद्दल मनोगते व्यक्त करून सन्मान केला.
डॉ. उपाध्ये यांनी बाबासाहेब चेडे यांच्या विषयी आठवणी सांगताना म्हणाले, उंदीरगाव, हरेगाव या परिसरात माझे बालपण, शिक्षण जडणघडण झाली आहे, चेडेबंधूचे कार्य जवळून पाहिले आहे, शिरसगाव परिसरात गेल्या ३५ वर्षापासून राहत असल्याने बाबासाहेब चेडे यांचे कार्य पाहत आहे, त्यांचा प्रसिद्धीपासून लांब राहवे असा स्वभाव असल्याने त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही. ग्रामीण भागातील अशा व्यक्तिमत्वाची सेवाकार्याची दखल घेणे गरजेचे आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपला उदरनिर्वाह व व्यवसाय करणारे चेडे हे शांत, मनमिळावू, चरित्र आणि चारित्र्य संपन्न आहेत, निर्मळ, निरपेक्ष मन ठेवून ते जीवनाची अमृततुल्य वाटचाल करीत आहेत, हे आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे.
बाबासाहेब चेडे यांनी आपल्या मनोगतातून आपली जीवनकथा सांगत चांगले वागावे, चांगले बोलावे, सर्वांशी मिसळून वागावे आणि शांत, हसत जीवन जगावे हा आईवडिलांचा संस्कार सतत जपत आहे, वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि थोरामोठ्यांच्या हस्ते सत्कार झाला, यातच मी कृतार्थ असल्याचे सांगून चेडे यांनी सर्वांचे आभार मानले.