पेमगिरीतील दत्त मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहास सुरुवात
नामसप्ताहाचे चौव्वेचाळीसाव्या वर्षात पदार्पण
संगमनेर | बाळासाहेब भोर : स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीतील दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे अखंड हरीनाम साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीही पंचक्रोशीतील सर्व भाविकांना महाराष्ट्रातील प्रतिभासंपन्न कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेचा लाभ मिळणार आहे.
गेली त्रेचाळीस वर्षांपासून सुरु असलेल्या अवधूत दत्तात्रयांच्या प्रांगणातील हा अखंड हरीनाम सप्ताह म्हणजे परिसरातील भाविक भक्तांसाठी मोठी पर्वणीच असते. वै.गुरुवर्य अच्छानंद बाबा ब्रह्मचारी यांच्या आशीर्वादाने, वारकरी संप्रदयातील महामेरू गुरुवर्य ह.भ.प. मनोहर महाराज भोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ह.भ.प. हौशीराम महाराज कोल्हे यांच्या सूत्रसंचालनाखाली हा नामयज्ञ आजपर्यंत मोठ्या उत्साहात अखंडपणे सुरु आहे.
गीता जयंती, दत्त जयंती व वै. अच्छानंद बाबा ब्रह्मचारी यांची पुण्यतिथी हा त्रिवेणी संगम त्रिगुणात्मक त्रिमूर्ती अवधूत दत्तात्रय यांच्या नामसप्ताहाचा विशेष दुग्धशर्करा योग आहे. तसेच दत्त जयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव याची देही याची डोळा बघावा असा भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे सर्व युवकवर्ग हा सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी तण मन धनाने या धार्मिक कार्यात सहभागी असतात.
बुधवार दि. 11 डिसेंबर पासून सायं. 7 ते 9 या वेळेत अनुक्रमे ह.भ.प. सुदाम महाराज कोकणे, ह.भ.प. साहिल महाराज दिवेकर, ह.भ.प. नवनाथ महाराज गिते, ह.भ.प.मनोहर महाराज भोर, ह.भ.प.कृष्णा महाराज कमानकर, ह.भ.प. तुकाराम महाराज घुगे, ह.भ.प. अनंत महाराज काळे यांची कीर्तनसेवा आयोजित केलेली आहे.
मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता वै. गुरुवर्य अच्छानंद बाबा ब्रह्मचारी यांची पालखी ग्राम प्रदक्षिणा होईल. बुधवार दि.18 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत ह.भ.प.अनंत महाराज काळे यांचे गोपाळ काल्याचे कीर्तन होईल. पेमगिरी व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविकांनी या नामसप्ताहात कीर्तनरुपी सेवेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती गुरुदत्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.