राहुरीत प्रचंड मोठे शक्तीप्रदर्शन करीत शिवाजीराव कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मतदारांची विक्रमी गर्दी पाहता माझा विजय आजच निश्चित झाला आहे : शिवाजीराव कर्डिले
राहुरी | अक्षय करपे : विधानसभेची यंदाची निवडणूक न लढवण्याचा माझा विचार होता. परंतु मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम व आग्रहास्तव मी पुन्हा एकदा त्याच जोमाने लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मागील निवडणुकीत माझा पराभव झाला. त्यावेळी विद्यमान लोकप्रतिनिधीने दिलेल्या आश्वासनांची ते पूर्तता करू शकले नाहीत. त्यामुळे जनतेच्या पदरी निराशा पडली. ही निराशा दूर करण्यासाठी मी मोठा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरलो आहे. आज या सभेला झालेली विक्रमी गर्दी पाहता मला वाटते ही निकालानंतरची विजयी सभाच आहे. मी मंजूर करून आणलेली अनेक विकासकामे बंद पाडणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधीला मतदानातून धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी मंगळवारी मोठे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांनी राहुरी शहरातून भव्य रॅली काढली. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करीत राहुरीकरांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विक्रम तांबे, सुभाष गायकवाड, विनायक देशमुख, युवा नेते अक्षय कर्डिले, राजू शेटे, माजी सभापती संभाजी पालवे, धनंजय गाडे, संदीप कर्डिले, सुरेश बानकर, भास्कर गाडे, रवींद्र थोरात आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्डिले यांनी आपल्या भाषणात विद्यमान लोकप्रतिनिधी प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, माझ्याकडे कुठलाही कारखाना, शैक्षणिक संस्था नाही. आमदार नसतानाही जनता माझ्याकडे व्यक्तिगत तसेच विकासाची कामे घेऊन येते. त्यांचे प्रश्न, अडीअडचणी सोडवण्याचे काम मी करीत असतो. तीस वर्षांपासून विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. पण यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली असल्यामुळे माझा विजय आजच निश्चित झाला आहे. मी मंजूर केलेल्या विकासाच्या योजना बंद पाडण्याचे काम या लोकप्रतिनिधींनी पाच वर्षात केले आहे. राहुरी शहराची पाणीपुरवठा योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करून घेतली होती. त्याचे श्रेय मला मिळू नये म्हणून ते मंत्री झाल्यानंतर ही योजना बंद करण्याचे काम त्यांनी केले. राहुरी शहरात आरोग्याचे केंद्र उभे राहावे यासाठी पालकमंत्री यांनी निधी उपलब्ध करून दिला. मात्र त्यांनी ते कामही मला श्रेय मिळेल म्हणून बंद पाडले. महायुती सरकारच्या काळात विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम मी केले आहे.
ज्येष्ठ नेते सुभाष पाटील म्हणाले, शिवाजीराव कर्डिले हे सर्वसामान्य जनतेचे नेते असून ते जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावत असतात. वांबोरी परिसरामध्ये सौर ऊर्जाचा मोठा प्रकल्प उभा राहणार आहे. या कामासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा निधी मंजूर करून दिला आहे. भाजप सरकारने लोक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.
अक्षय कर्डिले म्हणाले की, माझे वडील शिवाजीराव कर्डिले यांनी गेली 30 वर्षे कुटुंबाकडे अक्षरश: दुर्लक्ष करून समाजासाठी, सर्वसामान्यांसाठी झटून काम केले. मी आज 28 वर्षाचा झालो. मात्र त्यांनी मला कधीही वेळ दिला नाही. त्यांनी नेहमीच जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले. जनतेने देखील त्यांच्यावर खूप प्रेम केले. तरी देखील मागच्या निवडणुकीत आमचा पराभव झाला. त्यावेळी आमच्याकडून काही हलगर्जीपणा झाला. शिवाजीराव कर्डिले हे जनतेला नेहमीच हक्काचा आधार वाटतो. त्यामुळेच भाजपाच्या पहिल्या यादीत माझ्या वडिलांचे नाव उमेदवारीसाठी घोषित झाले. आम्ही केलेल्या कष्टाचे चीज झाले असे ते म्हणाले.
संभाजी पालवे यांचा भाजपमध्ये प्रवेश
पाथर्डी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना साथ देण्याचे जाहीर केले. तिसगाव तसेच परिसरात पालवे यांचे सामाजिक, राजकीय कार्य मोठे आहे. त्यांनी कर्डिले यांची विकासकामे करण्याची हातोटी व जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली आपुलकी, यामुळे प्रभावीत होवून पालवे यांनी कमळ हाती घेतले आहे.