संशोधकांनी उत्तम प्रतीच्या वाण निर्मितीवर भर द्यावा – डॉ. विठ्ठल शिर्के
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेले विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यानी भेट दिली. यावेळी बोलताना डॉ. विठ्ठल शिर्के यांनी संशोधकांनी उत्तम प्रतीच्या वाण निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी डॉ. शिर्के यांनी संशोधन केंद्रात सुरू असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांचा आढावा घेतला व प्रयोगांची पाहणी केली तसेच रोपवाटिकेस भेट देऊन शोभिवंत झाडांची मोठ्या प्रमाणात उत्पादन करून त्यांची विक्री कृषि महाविद्यालय विक्री दालन तसेच संशोधन केंद्रावरील विक्री केंद्रात करावी असे सुचवले. संशोधन केंद्राच्या भेटी दरम्यान संशोधन संचालक यांच्या शुभहस्ते माळी प्रशिक्षण केंद्रात वृक्षारोपण करून नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. दतात्रय लाड यानी संशोधन केंद्रावर सुरु असलेल्या संशोधन कार्याचे सादरीकरण केले.
संशोधन संचालक यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधतांना या संशोधन केंद्रावर विकसित केलेल्या डाळिंबाची गणेश व पेरूची सरदार या फळपिकांच्या लोकप्रिय वाणाबद्दल अभिमान व्यक्त करून सध्या कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांनी यांसारख्या उत्तम प्रतीच्या, कीड व रोगप्रतिकारक्षम आणि शेतकर्यांना फायदेशीर ठरतील अशा वाणांची निर्मिती करावी असे मत व्यक्त केले तसेच विभागीय कृषि संशोधन केंद्र गणेशखिंड, पुणे येथे सुरु असलेल्या संशोधन कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी विभागीय कृषि संशोधन केंद्रातील डॉ. व्ही.के. गरंडे, प्रा. एन.बी. शेख, डॉ. पी.एम. चौधरी, डॉ. जे.पी. यादव, डॉ. एस.के. चव्हाण, इतर शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.