ठळक बातम्या
तृतीयपंथीय व्यक्तींना सामाजिक सुरक्षा व कायदे विषयक, न्याय लढ्यासाठी सामाजिक न्याय विभाग पुढाकार घेणार- पुणे सहा. आयुक्त संगीता डावखर
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या सामाजिक सुरक्षा आणि कायदे विषयक न्यायाच्या लढ्यासाठी सामाजिक न्याय विभाग पुढाकार घेणार असे प्रतिपादन सहा. आयुक्त समाज कल्याण पुणे संगीता डावखर यांनी नुकत्याच झालेल्या चर्चासत्र प्रसंगी केले.
तृतीय पंथीय समूहातील नागरिकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठीचा सामाजिक न्यायाचा लढा अजून संपलेला नाही, विविध सामाजिक सुरक्षा योजना, ट्रान्सजेन्डर ओळखपत्र, आरोग्य योजना, विविध शासकीय योजनांचे संवेदीकरण इ मुद्द्यावर जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच यासाठी समाज कल्याण विभाग पुढाकार घेणार आहे असेही स.आयुक्त संगीता डावखर म्हणाल्या.
ट्रान्सजेन्डर व्यक्तींना दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणी, विविध शासकीय यंत्रणांच्या पातळीवर त्यांना येणारे अनुभव व शासकीय योजना अधिक सुलभपणे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन स्तरावर असलेले प्रयत्न या अनुषंगाने हे चर्चासत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पुणे येथे सहा.आयुक्त कार्यालय साज कल्याण पुणे आणि सेंटर फॉर आडव्होकसी व रिसर्च पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सामाजिक संस्था आणि एल जी बी टी क्यू ए समूहाच्या वतीने बिंदुमाधव खिरे, प्रा झमीर कांबळे, अनिल उकरंडे, मयुरी आळवेकर, सोनाल दळवी यांनी मुद्दे मांडले. त्यावर शासनाच्या वतीने शासकीय विभाग अधिकारी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
यावर बिंदू क्विअर राईट्स फौंडेशनचे बिंदूमाधव यांनी सांगितले की, कौटुंबिक कायद्यामध्ये वारसा हक्क मुलगा किंवा मुलगी यांनाच मिळतो. ट्रान्सजेन्डर व्यक्तीला वारसा हक्क मिळण्याविषयी तरतूद नसल्याने वडिलोपार्जित संपत्तीतून बेदखल केले जाऊ या भीतीने अनेक तृतीय पंथीय स्वत:चे ओळखपत्र बनवून घेण्यासाठी पुढे येत नाही. अशावेळी कायद्यात आवश्यक ते बदल होण्याची गरज आहे. शहरात देखील त्यांचेसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह अस्तित्वात नाही, असे मत ट्रान्सजेन्डर बोर्ड सदस्य सोनाली दळवी व्यक्त केले.
मयुरी आळवेकर यांनी सामाजिक सुरक्षा मदत आदीसाठी एक खिडकी योजना राबवावी असे सुचविले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सामाजिक सुरक्षा योजना पथदर्शी आहेत. या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेऊन अंमलबजावणी करावी. शालेय शिक्षणासाठी स्त्री पुरुष केन्द्री न राहाता यांचा समावेश व्हावा. कर वसुली पथकामध्ये तृतीय पंथियांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की जवळपास ५७ सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथीय नागरिकांसाठी स्वच्छतागृहे सुरु करणार आहोत. जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांनी रेशनकार्ड समस्या दूर केल्या जातील.
या चर्चासत्रात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सामाजिक न्याय विभाग, पुणे महापालिका पदाधिकारी आदी विविध सामाजिक संस्था पदाधिकारी उपस्थित होते. या विविध उपक्रमाबद्दल भूमी फौंडेशनच्या वतीने स.आयुक्त समाज कल्याण संगीता डावखर व सहकारी यांचे संस्थापक प्रा.कैलास पवार व सहकारी यांनी अभिनंदन केले.