चिमुकल्यांच्या अनोख्या दिंडीने भारावले चिंचोलीचे ग्रामस्थ
राहुरी | प्रतिनिधी : तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बालदिंडीने ग्रामस्थ भारावून गेले. विविध सामाजिक संदेश व आकर्षक वेशभुषा अतिशय लक्षवेधक ठरली. येथील गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा बोबे व सहशिक्षिका श्रीमती अनुराधा भिंगारदिवे यांच्या कल्पनेतून चिमुकल्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
रस्यावरील दररोजच्या दृष्टीस पडणाऱ्या दिंड्यांनी चिमुकल्यांनाही मोठे कुतूहल लागले होते. त्यानुषंगाने प्रत्यक्ष दिंडीचा अनुभव घेण्यासाठी अनेक शाळांमधून प्रत्यक्ष दिंड्याचे आयोजन शिक्षकांकडून केले जाते. त्या पार्श्वभूमीवर शाळेतील शिक्षकांनी मुलांना याची देही याची डोळा प्रत्यक्ष दिंडीची अनुभूती देण्यासाठी चिमुकल्यांची दिंडी काढली. या दिंडीतून माञ त्यांनी वर्तमान परिस्थितीवरील पर्यावरण, स्वच्छता, प्रदुषण या बरोबरच मानवी जीवनाशी निगडित ज्वलंत प्रश्न जनमाणसांसमोर मांडत मानवाचं प्रबोधन व्हावं व निसर्गाप्रती सजग राहण्यासाठीचे विषय दिंडीतून हाती घेतले. चिमुकल्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपापली भुमिका यशस्वीपणे पार पाडली. बालवयात त्यांना मिळत असलेल्या या मानवी जीवनाशी निगडित प्रश्नाने प्रबोधन होवून ‘एक तरी झाड असावे परसदारी’ चा आगळावेगळा संदेश दिला. या उपक्रमाचे जनतेतून भरभरून कौतुक होत आहे.
विठ्ठल, रखुमाई बरोबरच वारकऱ्यांच्या वेषातील चिमुकल्यांनी गावकऱ्यांनाही या दिंडीत सहभागी करून घेतले. शाळेतून निघालेल्या दिंडीतील बालवारकऱ्यांनी विठ्ठलनामाचा जयघोष करत वातावरण विठ्ठलमय केले. यात प्रामुख्याने वृक्षलागवड, परिसर स्वच्छता, अंतर्गत स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती सारखे सामाजिक संदेश जनतेत सहजरित्या पोहोचविण्यात चिमुकले यशस्वी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
दिंडीसाठी गावच्या सरपंच सौ. शोभाताई लाटे, अर्जुन निकम व बाबासाहेब सोनवणे यांनी नाश्ता व अल्पोपहाराचा प्रसाद प्रसंगी चिमुकल्यांना दिला. याप्रसंगी गावातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता. सविता राऊत यांनी सामाजिक संदेश देणारी रांगोळी काढून दिंडीचे स्वागत केले. सौ.अश्विनी सोनवणे यांनी विठ्ठल-रुक्मिणी, विणेकरी यांचे पूजन केले. ज्येष्ठ महिलांनी दिंडीत सहभागी होत अभंग, गवळणी गात विद्यार्थ्यांना पारंपरिक गायन प्रकाराची ओळख करून दिली.
दिंडी सोहळ्यात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अनिता भोसले, सपना भोसले, मनिषा भोसले, उत्कर्षा सोनवणे, मनिषा गागरे, शालिनी भोसले, सुंदरबाई भोसले, अर्चना भोसले, सुभद्रा नवले, रुक्मिणी राऊत, अनिता माळी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावकऱ्यांनी सदर उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.