डॉ. आंबेडकर जयंतीदिनी दिव्यांग मतदार जनजागृती अभियान भूषणावह – तहसीलदार मिलिंदकुमार वाघ
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिव्यांग मतदार जनजागृती अभियान राबविण्याचा योगायोग नक्कीच भूषणावह आहे. कारण संविधानाच्या माध्यमातून महामानव बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. यु.एस.ए.व प्रगत देशांमध्ये फक्त पुरुषांनाच मतदानाचा अधिकार होता. महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागला. आपल्याला तो अधिकार डॉ. बाबासाहेबांमुळे प्राप्त झाला. त्या संधीचे सोने आपण मतदान करून केले पाहिजे.
प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींसाठी अडथळा विरहित सुविधा, व्हीलचेअर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आवश्यक सुविधा देण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्ती करिता आशा वर्कर, एन.एस.एस.व एन.सी.सी.चे विद्यार्थी विशेष सहकार्य करणार आहे. जी दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रापर्यंत येऊ शकत नाही. त्यांचे फाॅर्म प्रत्येक विभागनिहाय मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन नोंदणी करत आहेत. 13 मे रोजी प्रचंड उष्णता असणार आहे. त्यामुळे सकाळी आपण मतदान प्रक्रिया पार पाडावी. अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना यांचे प्रशासनास नेहमीच सहकार्य मिळत आहे. सदृढ व सक्षम लोकशाही करिता 100% मतदान करावे असे आवाहन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिव्यांग मतदार जनजागृती व दिव्यांग कायदे प्रबोधन मेळावा उद्घाटनप्रसंगी केले.
अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्षा हाॅल बोंबले पाटील नगर श्रीरामपूर येथे दिव्यांग मतदार जनजागृती अभियान व दिव्यांग कायदे प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे सचिव सुकदेव सुकळे होते तर विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष टी.ई. शेळके, जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये, स्वीप समन्वयक गणेश पिंगळे, अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड, आरोग्य मित्र सुभाष गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, महिला प्रदेशाध्यक्ष स्नेहा कुलकर्णी, खजिनदार सौ.साधना चुडिवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मतदान संदर्भात उपस्थित दिव्यांग व्यक्तींना तहसीलदार यांनी सामुहिक शपथ दिली. माजी प्राचार्य टी.ई.शेळके, डॉ बाबुराव उपाध्ये, सुभाष गायकवाड, सुकदेव सुकळे यांनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांगाकरिता उपक्रमशील कार्यक्रमाचे विशेष कौतुक करून संयोजक संजय साळवे व वर्षा गायकवाड यांना विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानचिन्ह व पुस्तके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी रमजान ईद निमित्त ईद मिलाद कार्यक्रम देखील संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधाकर बागुल, सौ.रजिया तांबोळी, कादिर शेख, गंगाधर सोमवंशी, कु.प्रज्ञा बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केले तर आभार मुश्ताकभाई तांबोळी यांनी मानले.