महिलादिन हा महिला सन्मानाचा दिवस जनमनी अखंड दिसला पाहिजे – प्राचार्या गायकवाड
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : महिला सबलीकरण हा नव्या युगाचा जयघोष आहे, महिलादिनाचे कार्यक्रम उत्साहाने साजरे केले जातात, परंतु महिलादिन हा केवळ एक दिवशीय उत्सव न राहता त्यातील महिला सन्मान हा अखंडपणे जनमाणसात उक्तीकृतीत दिसला पाहिजे, अशी अपेक्षा खंडाळा येथील कविसंमेलन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात अशोकनगर येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनीताताई गायकवाड यांनी व्यक्त केली.
खंडाळा येथील अक्षर साहित्य प्रबोधन मंच आणि रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय महिलादिन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ.सुनीताताई गायकवाड बोलत होत्या. स्नेह परिवार ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक माजी प्राचार्य शंकरराव अनारसे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, सुखदेव सुकळे, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्य भागवत ढोकचौळे, सरपंच बर्डेताई, ग्रा.सदस्या मंजुषाताई ढोकचौळे, पत्रकार अशोक अभंग आदिंनी मनोगत व्यक्त करून कविता सादर केल्या. कवी, गीतकार बाबासाहेब पवार, आदिती डांगे, शाळेतील इतर विद्यार्थिंनी यासह मान्यवरांनी मनोगतासह कविता सादर केल्या.
उद्घाटनपर भाषणात प्राचार्य टी इ शेळके यांनी खंडाळा गावात महिलादिन निमित्ताने कविसंमेलन घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सुखदेव सुकळे, वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रकाश किरण प्रतिष्ठानतर्फे लेविन भोसले, अक्षर साहित्य प्रबोधन मंचतर्फ एकनाथ डांगे इत्यादिंनी मुख्याध्यापक अरुण बनसोडे, सौ. सुनीता बनसोडे यांना गौरवचिन्ह, बुके, पुस्तके, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केले. मुखाध्यापक बनसोडे यांनी आलेल्या गुरुजन, कविंचा सन्मान करून अनेकांनी केलेल्या सत्काराविषयी धन्यवाद व्यक्त केले.
प्राचार्या डॉ. सुनीताताई गायकवाड यांनी कविता सादर करून शाळेच्या प्रगतीबद्दल, गावाच्या प्रेमाविषयी आनंद व्यक्त केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी महिलादिन कविसंमेलन भूमिका स्पष्ट करून कविंचा परिचय करून दिला. प्रा. शिवाजीराव बारगळ, लेविन भोसले, बापूसाहेब सदाफळ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विजयराव चव्हाण, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक बतीसे एम.एम. हे उपस्थित होते. अनेकांनी उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या. सूत्रसंचालन श्रीमती एन.ए.पालवे यांनी केले तर श्रीमती पवार आर.डी. यांनी आभार मानले.