स्वतःवर ठाम विश्वास असेल तरच तुम्ही उद्योजक म्हणुन यशस्वी व्हाल – डॉ. नलावडे
राहुरी | जावेद शेख : भारत शेतीप्रधान देश आहे. येथील लोकसंख्येचा विचार करता अन्नाशी संबंधीत कोणताही व्यवसाय स्वतःवर ठाम विश्वास ठेवून जिद्दीने तसेच प्रामाणिकपणे केल्यास तुम्ही नक्कीच उद्योजक म्हणुन जीवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन कृषि यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दि. 18 ते 22 मार्च, 2024 या कालावधीत बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ. सचिन नलावडे बोलत होते. यावेळी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख तथा या प्रशिक्षणाचे आयोजक डॉ. विक्रम कड, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील गणित विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम पाटील, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. एम.आर. पाटील व डॉ. बाबासाहेब भिटे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. विक्रम कड आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की तुम्ही जोपर्यंत स्वतः एखादा पदार्थ बनवत नाही तोपर्यंत तुम्हाला तो पदार्थ बनविण्याचा आत्मविश्वास येणार नाही. त्यामुळे या प्रशिक्षणात प्रात्यक्षिकांवर जास्त भर देण्यात आला जेणेकरुन तुम्हाला स्वतःचा उद्योग सुरु करण्याचा आत्मविश्वास येईल. भविष्यात तुम्ही सुरु केलेल्या उद्योगाविषयी कोणतीही अडचण आल्यास राहुरी येथील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी मदतीसाठी सदैव तत्पर असतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना दिली.
यावेळी डॉ. विक्रम पाटील, डॉ. एम.आर. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विकास ठुबे, सोनाली शेटे, प्रशांत मोरे, सम्राट लांडगे व दिपीका काळे या प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल घुगे यांनी तर आभार डॉ. बाबासाहेब भिटे यांनी मानले.
या प्रशिक्षणासाठी विविध जिल्ह्यातून 21 महिला व 9 युवक अशा एकुण 30 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागातील श्रीमती सविता धनवटे, पोपट खर्से, गोरक्षनाथ चौधरी, सुभाष माने यांनी परिश्रम घेतले.