बेकरी व्यवसाय प्रशिक्षणातून उद्योजक निर्माण होणे विद्यापीठासाठी भुषणावह – संशोधन संचालक डॉ. गोरंटीवार
राहुरी | जावेद शेख : अलीकडच्या काळात बेकरी पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात होणार्या बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान प्रशिक्षणामुळे बेकरी व्यवसायाला चालणा मिळणार असून यामुळे गावपातळीवर आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होणार आहे. बचत गटाशी संबंधीत महिला तसेच ग्रामीण भागातील तरुणांनी या बेकरी व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घेवून स्वतःचा उद्योग उभारल्यास विद्यापीठासाठी भुषणावह ठरेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दि. 18 ते 22 मार्च, 2024 या कालावधीत बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ. सुनील गोरंटीवार बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कृषिविद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख तथा या प्रशिक्षणाचे आयोजक डॉ. विक्रम कड, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे व डॉ. बाबासाहेब भिटे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. श्रीमंत रणपिसे मार्गदर्शन करताना म्हणाले की भरडधान्यामधील महत्वाचे पीक असणार्या नागलीच्या बिस्कीटांना पौष्टिक गुणधर्मामुळे मोठी मागणी आहे. लहान मुले तसेच महिलांसाठी नाचणीसत्व त्यातील पोषणमुल्यामुळे महत्वाचे आहे. याचा फायदा या प्रशिक्षणामध्ये सहभागी महिलांनी स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी करुन घ्यावा जेणेकरुन या व्यवसायामुळे त्यांना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होता येईल.
डॉ. दिलीप पवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की शेतकरी युवकांनी त्यांच्या शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड दिल्यास त्यांचे उत्पन्न खर्या अर्थाने दुप्पट होण्यास मदत होईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. विक्रम कड आपल्या प्रास्ताविकात प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल घुगे यांनी तर आभार डॉ. बाबासाहेब भिटे यांनी मानले. या प्रशिक्षणासाठी विविध जिल्ह्यातून 21 महिला व 9 युवक अश्या एकुण 30 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला आहे.