डॉ. नवले यांच्या पुस्तकास महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पं. महावीर प्रसाद द्विवेदी पुरस्कार जाहीर
राहुरी | बाळकृष्ण भोसले : लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथील हिंदी विभागातील सहायक प्राध्यापक व हिंदी विभाग प्रमुख डॉ. भाऊसाहेब नवनाथ नवले यांच्या ‘वैश्वीकरण और हिंदी का रोजगारोन्मुख परिदृश्य’ या पुस्तकास महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पं. महावीर प्रसाद द्विवेदी पुरस्कार नुकताच जाहीर झाला.
हिंदी भाषेसंबंधी लेखनासाठी अकादमी कडून हा पुरस्कार देण्यात आला आहे. रोख रक्कम पस्तीस हजार रुपये आणि स्वर्णपदक, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी विविध साहित्य प्रकारातून अकादमी च्या माध्यमातून हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी हे पुरस्कार दिले जातात. लवकरच मुम्बई मध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
डॉ. नवले यांची आतापर्यंत तीन पुस्तके प्रकाशित तर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या ‘विचार तर कराल’ या पुस्तकाचे त्यांनी ‘सोचिए तो सही’ या शीर्षकाने हिंदीत भाषांतर केले आहे. भारतातील नामवंत प्रकाशक राजकमल प्रकाशन, दिल्ली यांनी ते प्रकाशित केले आहे. चार संशोधन मासिकाच्या विशेषांकाचे संपादक म्हणूनही डॉ. नवले यांनी काम पाहिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे दोन संशोधन प्रकल्प डॉ. नवले यांनी पूर्ण केले आहेत. तर एका बृहत संशोधन प्रकल्पाचे प्रोजेक्ट फेलो म्हणून ही संशोधन क्षेत्रातील त्यांचा अनुभव उल्लेखनीय आहे.
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय संशोधन पत्रिकेतून त्यांचे ७९ पेक्षा जास्त संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. याचबरोबर डॉ. नवले यांनी ३१ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय व विद्यापीठ स्तरीय चर्चासत्र आणि कार्यशाळा मध्ये साधन व्यक्ती आणि प्रमुख पाहुणे म्हणूनही हिंदी भाषा आणि साहित्यामध्ये योगदान दिले आहे. त्यांनी आतापर्यंत पाच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केले आहे.
डॉ. नवले यांनी शैक्षणिक योगदानाबरोबरच वर्ष २०१८ पासून २०२१ पर्यंत संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोल्हार आणि सात्रळ येथे उप-प्राचार्य, महाविद्यालय परीक्षा अधिकारी, संशोधन समन्वयक आणि अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष सदस्य म्हणूनही प्रशासनिक कामकाज पहिले आहे. त्यांच्या हिंदी भाषेतील योगदानाबद्दल गेल्या वर्षी हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेचा साहित्यातील मातृभूमी भूषण सम्मान देऊन गौरव करण्यात आला होता. या बरोबरच ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचा उत्कृष्ट हिंदी अध्यापक पुरस्कार ही मिळाला आहे.
डॉ. नवले हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीएच. डी. चे संशोधक मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. त्यांचे मार्गदर्शनाखाली चार पीएच.डी. चे विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम. ए. हिंदी अभ्यासक्रम पुस्तिकेचे लेखक म्हणून ही डॉ. नवले यांनी योगदान दिले आहे. ते महाराष्ट्र हिंदी परिषद, कोल्हापूर या संस्थेचे आजीवन सदस्य आहेत.
डॉ. नवले यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा इस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणीचे कुलपती व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिक विभागाचे शिक्षण संचालक प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे, उपप्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उप-परिसर समिती सदस्य डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप यांचेसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आणि पुढील लेखकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.