गुन्हे वार्ता
नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी गजाआड, सैराट चित्रपटातील प्रिन्स पोलिसांच्या रडारवर
राहुरी | बाळकृष्ण भोसले – मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखो रूपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महत्त्वाचे म्हणजे लोकप्रिय मराठी चित्रपट सैराटमधील प्रिंन्सची भूमिका साकारणारा अभिनेता सुरज पवार देखील यामध्ये आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असल्याने आता सुरज पवार राहुरी पोलिसांच्या रडारवर आला आहे. यामध्ये प्रसिद्ध चिञपट निर्माते व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावाचा देखील आरोपींनी वापर केल्याचे समोर येत आहे.
व्हिडिओ पहा: नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी गजाआड, सैराट चित्रपटातील प्रिन्स पोलिसांच्या रडारवर…
याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेवासा तालुक्यातील भेंडा येथील महेश बाळकृष्ण वाघडकर यांना ३ सप्टेंबर रोजी एक फोन आला. समोरची व्यक्ती म्हणाली की मी श्रीरंग कुलकर्णी सामाजिक न्याय विभाग मंत्रालयातून बोलतोय आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यु झाला आहे. त्यांच्या सहाय्यक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तेथे तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापुर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात नोकरीची ऑर्डर देण्यात येईल तेंव्हा तीन लाख रुपये द्या, पोटापाण्याचा प्रश्न असल्याने वाघडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शविली. तोतया श्रीरंग कुलकर्णी हा तेथे आला तेव्हा तो राहुरी विद्यापीठाच्या व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे थांबला होता. त्याच्याकडे काही बनावट कार्ड असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जेव्हा आरोपी आणि फिर्यादी हे तेथे भेटले तेव्हा आरोपीच्या काही गोष्टींचा वाघडकर यांना संशय आला. तोतया श्रीरंग कुलकर्णी याने आपली फसवणुक केली जात आहे असे लक्षात आल्याने रक्कम देण्याचे टाळले व आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली.
राहुरी पोलिसांनी यासंबंधात सखोल चौकशी केली असता लक्षात आले की, श्रीरंग कुलकर्णी हा कोणी व्यक्ती मंत्रालयात नसल्याचे चौकशीअंती समोर आले आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचेकडे सविस्तर चौकशी केली असता बनावट शिक्के व शासकीय बनावट जी. आर. व अन्य कागदपत्रे या आरोपींकडून हस्तगत केले. यामधील दत्तात्रय अरूण क्षिरसागर, आकाश विष्णु शिंदे, ओमकार नंदकुमार तरटे, सर्व राहणार संगमनेर यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यामध्ये सैराट चित्रपटातील प्रिंन्सची भूमिका साकारणारा सुरज पवारचा देखील सहभाग असल्याचे आरोपींकडून सांगण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये नागराज मंजुळे यांच्या नावाचा वापर केल्याचे समजते. पो.नि. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सज्जन नऱ्हेडा याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.