साहित्य व संस्कृती
मेल्यानंतर नव्हे तर जिवंतपणी मातापित्यांना जपणे गरजेचे – डॉ.शिवाजी काळे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : जन्म -जीवन -मरण हे सृष्टीचे अपरिहार्य चक्र आहे, त्यातून कुणाची सुटका नाही, भारतीय संस्कृती ही ऋणानुबंध जपणारी आहे,कुटुंबसंस्था ही जीवनमूल्ये जपणारी प्रणाली आहे. पितृपक्ष या उपक्रमातून हा धागा जपायचा असतो, त्यामुळे मेल्यावर नव्हे तर जिवंतपणी मातापित्यांना जपणे हेच खरे पुण्यफळ गरजेचे असते, असे मत जेष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ.शिवाजी काळे यांनी व्यक्त केले.
येथील माऊली वृद्धाश्रमात डॉ. शिवाजी काळे ह्यांनी ‘पितृपक्ष’निमित्त किराणा वस्तूसह इतर मदत दिली, त्यानिमित्ताने माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी डॉ. शिवाजी काळे यांचा सन्मान केला. सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी सौ.मोहिनी काळे यांचा, सौ. मंदाकिनी उपाध्ये यांचा सौ. वंदना विसपुते यांनी तर सुभाष वाघुंडे यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये, सुयश काळे यांचा सन्मान केला. डॉ.शिवाजी काळे यांनी माऊली वृद्धाश्रमाचे कार्य हे मानवताप्रेमाचे कार्य आहे ह्या कार्याला आपण सदैव सहकार्य करणार आहे, असे सांगितले.
डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी सुभाष वाघुंडे आणि सौ.वाघुंडे यांचे योगदान सांगून डॉ. शिवाजी काळे व परिवाराचा आदर्श सर्वत्र दिसला पाहिजे, असे सांगितले. वृद्धाश्रमातील चोख व्यवस्था, स्वच्छता, आनंदी वातावरण, घरगुती भाजीपाला लागवड, राजहंस पक्षी व्यवस्था, श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिवलिंग मूर्तीस्थळ आणि वृक्षारोपण, संवर्धन पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला. सुभाष वाघुंडे यांनी माहिती सांगून आभार मानले.