पारगावच्या नावाने शेतमालाचा ब्रँड तयार व्हावा- कार्यकारी परिषद सदस्य गणेश शिंदे
राहुरी विद्यापीठ : जोपर्यंत शेतकर्याच्या घामाला प्रतिष्ठा मिळत नाही, तो आर्थिकदृष्ट्या संपन्न होत नाही तोपर्यंत गाव समृध्द होणार नाही. आपण जर नवनविन तंत्रज्ञान अवगत केले तरच आपण बाजारात टिकू शकू. जग बदलत असून आपणही बदलत्या काळानुसार, वेळेनुसार शेतीमध्ये बदल केले पाहिजेत. कृषि विद्यापीठाने संशोधीत केलेल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषि विभागाच्या योजना यांचा आपण अवलंब करायला हवा. शेतीमध्ये काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा वापर करुन मुल्यवर्धनाने पारगावचा ब्रँड तयार झाला पाहिजे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य गणेश शिंदे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठ व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे पारगाव, ता.जि. अहमदनगर येथे शेतकरी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणुन गणेश शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील होते.
याप्रसंगी अहमदनगरचे उपविभागीय कृषि अधिकारी पोपटराव नवले, प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे, जनसंपर्क अधिकारी डॉ. गोकुळ वामन, विषय विशेषज्ञ डॉ. अन्सार आत्तार, डॉ. भगवान देशमुख, मंडल कृषि अधिकारी संदिप वराळे, नारायण कारांडे, कृषि पर्यवेक्षक विजय सोमवंशी, शंकर खाडे उपस्थित होते.
गणेश शिंदे पुढे म्हणाले की आजच्या या कार्यक्रमापुरते कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व पारगावचे नाते न राहता या समन्वयाने नवे उपक्रम कसे सुरु होतील हे पहावे लागेल. कृषि विद्यापीठाच्या ज्ञानाने व कृषि विभागाच्या योजनांनी सर्वसामन्यांचे हीत कसे होईल हे पाहिले पाहिजे तरच त्याचा फायदा झाला असे म्हणावे लागेल. कृषि विद्यापीठ, कृषि विभागाची मदत व शेतकर्यांचे कष्ट एकत्र आले तरच शेतकर्यांचा फायदा होईल असे यावेळी ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये डॉ. सी.एस. पाटील म्हणाले की विद्यापीठात होत असलेल्या शेतीमधील नवनविन संशोधनाचा फायदा शेतकर्यांनी घ्यायला हवा. या संशोधनाचा वापर आपण आपल्या शेतीत करायला हवा. विद्यापीठे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपले संशोधन करीत असतात. शेतकर्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी कृषि विद्यापीठ कटीबध्द असल्याचे यावेळी ते म्हणाले.
यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनात गणेशखिंड येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नजीमुद्दीन शेख यांनी केळी लागवड तंत्रज्ञान, उद्यानविद्या विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर क्षिरसागर यांनी कांदा बिजोत्पादन तंत्रज्ञान, कसबे डिग्रज, जि. सांगली येथील हळद संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज माळी यांनी हळद लागवड तंत्रज्ञान, राहुरी येथील गो संशोधन प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र निमसे यांनी कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय नियोजन व पोपटराव नवले यांनी कृषि विभागाच्या विविध योजना या विविध विषयांवर उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी तर आभार डॉ. दत्तात्रय पाचारणे यांनी मानले. या मेळाव्यासाठी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, पारगावचे कृषि सहाय्यक श्रीमती जयश्री मुंजाळ, उमेश डोईफोडे, ग्रामसेवक श्री. बोरुडे, उपसरपंच श्रीमती भोसले, अतुल शिंदे, शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.