कोंढवड ग्रामपंचायतीकडून केंद्र सरकारच्या मोहिमेची पायमल्ली
राहुरी : केंद्र व राज्य शासन अत्यावश्यक असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असून नफेत असणाऱ्या चौदा गाव पाणीपुरवठा योजनेमधील कोंढवड गावातील ग्रामपंचायतीने पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी मात्र संपूर्ण गावातील नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करून सणासुदीच्या काळात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणून पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आणली आहे.
यासंदर्भात अखिल भारतीय क्रांतीसेनेकडून ग्रामपंचायत कार्यालय कोंढवड, राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, शासन स्वच्छ व टँकरमुक्त पाणी पुरवठा करण्यासाठी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर नल, हर घर जल’ अशा मोहिमेद्वारे लाखो रुपये खर्च करून अनेक योजना राबवित असताना नफ्यात असलेल्या बारागाव नांदूरसह चौदा गाव पाणीपुरवठा योजना चालू असताना योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या कोंढवड ग्रामपंचायतीने मात्र पाणीपट्टी थकबाकीच्या नावाखाली संपूर्ण गावातील थकीत व बिगर थकीत नागरिकांचा नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करत सणासुदीच्या काळात जनतेला वेठीस धरून आडमुठेपणाचे धोरण स्विकारले आहे.
दोन दिवसांपासून पाणी येत नसल्याने माझ्या प्रभागातील थकबाकी नसलेल्या नागरिकांनी पाण्यासाठी माझी भेट घेतल्याने मी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
राकेश म्हसे, ग्रामपंचायत सदस्य कोंढवड.
यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे गावातील नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे व ग्रामपंचायत सदस्य राकेश म्हसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गावातील थकबाकी वाढल्याने आम्ही आमच्या गाव पातळीवर दोन दिवसांपासून पाणी बंद केला आहे. जोपर्यंत वसूली होत नाही, तोपर्यंत थकबाकी नसलेल्या ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारं आहोत.
शिवाजी पल्हारे, ग्रामसेवक कोंढवड.