सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती पत्रकारांनी निरपेक्ष भावनेने काम करणे गरजेचे – प्रभंजन कनिंगध्वज
जिल्हा सचिवपदी बाळकृष्ण भोसले यांची निवड
नगर : ग्रामीण भागातील नवोदित पत्रकारांनी समाज घटकातल्या सर्वसामान्य माणसाला समोर ठेवून त्यांच्या मुलभूत प्रश्नांप्रती बांधिलकी ठेवणे अपेक्षित आहे, तरच त्या पत्रकारितेला न्याय मिळेल. आज आलेल्या बातम्या फक्त पुढे पाठवून चालणार नाही तर तळागाळात जात पत्रकाराने स्वतः लिहीत होत समाजमन एकत्र ठेवण्याचा महत्वाचा दुवा म्हणून ओळख निर्माण करणं गरजेच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रभंजन कनिंगध्वज यांनी केले.
राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे होते. प्रसंगी अहमदनगर जिल्हा प्रमुख सल्लागारपदी प्रभंजन कनिंगध्वज तर जिल्हा अध्यक्षपदी अहमदनगर शहरातील पत्रकार महेश भोसले यांची तर सचिवपदी राहुरीतील बाळकृष्ण भोसले यांची निवड करण्यात आली. प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रसंगी अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अजय साळवे उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष महेश भोसले म्हणाले की, दिवसेंदिवस पत्रकारांवर हल्ले होत असून ग्रामीण भागातील पत्रकार सुरक्षित नाही. त्या पत्रकारांना सुयोग्य न्याय मिळण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असून या पत्रकारांच्या अनेकविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे यांनीही कार्यकारिणीला शुभेच्छा देत सामाजिक प्रश्नांप्रती कार्यरत राहण्याचे आवाहन नूतन कार्यकारीणीतील पदाधिकार्यांना केले. यावेळी सोनू शिंदे, येशुदास वाघमारे, जितेंद्र कांबळे, कैलास गायकवाड, अभिजित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.