अहिल्यानगर
सात्रळ महाविद्यालयात मंगळवारी आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
राहुरी | बाळकृष्ण भोसले – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सात्रळ (ता. राहुरी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: धम्मचक्र प्रवर्तन- माझा दृष्टिकोन’ या विषयावर एक दिवसीय आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन मंगळवार, दि. ४ ऑक्टोबर २०२२ रोजी स. १०:०० वा. करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर डोंगरे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन होणार आहे. परिसंवादामध्ये महात्मा गांधी संस्था, मॉरिशस येथील ज्येष्ठ प्राध्यापक प्रो. (डॉ.) बीदन आबा, मध्य प्रदेश भोपाळ येथील कथाकार व भारतीय प्रशासकीय सेवाधिकारी कैलास वानखेडे, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक आणि मा. कुलगुरू प्रो. (डॉ.) नागनाथ कोत्तापल्ले, माजी संपादक अरुण खोरे, सा. फु. पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रो. (डॉ.) मनोहर जाधव, महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. विश्वनाथ शिंदे इ. ज्येष्ठ विचारवंत भाष्य करणार करणार असल्याचे उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, डॉ. जयश्री सिनगर यांनी सांगितले.
शतकानुशतके चालत आलेल्या वर्णव्यवस्थेला आणि जातीव्यवस्थेला बाबासाहेबांनी मूठमाती दिली तो दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन. या घटनेला ६६ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने बाबासाहेबांच्या उदात्त विचारांचे समरण, चिंतन करून वेगवेगळे दृष्टीकोन समोर यावेत या उद्देशाने हा परिसंवाद आयोजित करण्यात येत आहे. आंतरविद्याशाखीय परिसंवादास भारतभरातून विविध विद्याशाखांचे अभ्यासाक, संशोधक, प्राध्यापक, मार्गदर्शक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित राहणार असून हा आंतरराष्ट्रीय परिसंवाद प्रत्यक्ष (ऑफलाइन) स्वरूपात आयोजित करण्यात आल्याची माहिती समन्वयक व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी दिली.