आईरूपात आहे, जगी देवत्वाचा साक्षत्कार – ह.भ.प. प्रा.सखाराम महाराज कर्डिले
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आई म्हणजे आत्म्याचा ईश्वर होय. माता, माती, मातृभाषा, मातृभूमी आणि माणुसकी ही पंचभक्ती केली तर संस्कृतीची जीवनशक्ती मिळते, साधुसंतांची संगत आणि त्यांचे वाड्मय हॆ कुटुंबनीतीचे आणि संस्कार शक्तीचे शब्दधन देतात ते वाचले पाहिजे असे विचार ह.भ.प. प्रा.सखाराम महाराज कर्डिले यांनी व्यक्त केले.
येथील गोंधवनी परिसरातील श्री महादेव मंदिर देवस्थानच्या सांस्कृतिक भवनमध्ये ह.भ.प. प्रा.सखाराम महाराज कर्डिले यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभन्गचरणाचा अर्थ सांगताना आपले विचार व्यक्त केले. स्व.रखमबाई तबाजी भगत यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तनात प्रा.सखाराम महाराज कर्डिले बोलत होते. विष्णू भगत, पोपटराव भगत, बबनराव भगत यांनी कर्डिले महाराज आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत, सत्कार केले. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्राचार्य टी.ई. शेळके, प्राचार्य डॉ. एकनाथ ढोणे, साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये, प्राचार्य किसनराव वमने यांनी मनोगत व्यक्त केले.
ह.भ.प. प्रा. सखाराम महाराज कर्डिले पुढे म्हणाले, माणूस ज्ञानी हवा पण तो नम्र हवा. अहंकार हा माणुसकीचा शत्रू आहे. जो दुसऱ्याला तुच्छ लेखतो तो माणसातून वायाला जातो. इंद्रिये निर्मळ ठेवा. जीभ, नाक, डोळे, कान आणि त्वचा ही पंचेंद्रिये स्वच्छ तर त्याचे जीवन शुद्ध होते. शुद्ध मन हेच मंदिर आहे. स्व.रखमबाई भगत यांनी अपार कष्ट सोसले, मुलांना शिक्षण दिले, संस्कार दिले आणि देवत्वाची जाण ठेवली अशी माता म्हणजे पुण्याई आहे. आई म्हणजे सकल तीर्थाचे तीर्थ आहे. शरीर चांगले तर सर्व जग चांगले, ‘देह जाईल जाईल त्याला काळोबा खाईल’ हॆ लक्षात ठेवून दुसऱ्यांना समजून घेतले की जग आपलेसे होते, असे विचार सांगून कुटुंबनीती आणि जीवनगतीचे महत्व विशद केले.
यावेळी प्राचार्य पोटघन, प्रा. डॉ. बाळासाहेब बढे, सुखदेव सुकळे, लहानू रहाणे, सयाजीराव देशमुख आदिंनी भगत परिवाराचे कौतुक केले. सौ.नानूबाई लहानू हिरगळ, सौ. शशिकला रंगनाथ वाणी, डॉ. देवेन्द्र भगत, महेंद्र भगत, रवींद्र भगत, राजेंद्र भगत, विश्वास भगत, बाबुराव खेमनर, जालिंदर खेमनर, धर्मनाथ खेमनर, सौ. सुलभा खेमनर आदिंनी नियोजनात भाग घेतला. प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू भगत यांनी महादेव देवस्थान ट्रस्टला देणगी चेक देऊन आभार मानले.