कृषी

देशात कडधान्यावर संशोधन करण्यासाठी विशेष रोडमॅप तयार करण्याची गरज – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

महात्मा फुले कृषि विद्यापीठात 28 वी वार्षिक रब्बी कडधान्य बैठकीचे उद्घाटन संपन्न

राहुरी विद्यापीठ : महाराष्ट्रात सोयाबीन पिकानंतर हरभरा पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. कडधान्य हा प्रथिनांचा मोठा स्त्रोत असल्याने आहारात कडधान्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. शासनाने कडधान्याखालील क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी उपक्रम राबविले. त्यामुळे देश कडधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला आहे. सध्या बदलत्या हवामानात तग धरुन राहणारे, अधिक उत्पादन देणारे, यंत्राच्या सहाय्याने काढता येणारे वाण या बाबींवर संशोधनाची दिशा निश्चित व्हावी तसेच स्पीड ब्रिडींग, अधिक पोषणमुल्य असलेले वाण यावरही संशोधन आधारीत असावे. यासाठी कडधान्य व तेलबिया पिकांमधील संशोधनासाठी विशेष रोडमॅप तयार करावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कडधान्य सुधार प्रकल्प आणि भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर (भा.कृ.अ.प.) यांचे संयुक्त विद्यमाने 28 व्या वार्षिक रब्बी कडधान्य बैठकीचे आयोजन दि. 1 ते 3 सप्टेंबर, 2023 या कालावधीत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे करण्यात आले आहे. या वार्षिक रब्बी कडधान्य बैठकीच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पाटील बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक (तेलबिया आणि कडधान्य) डॉ. संजीव गुप्ता हे उपस्थित होते.

याप्रसंगी कानपूर येथील भारतीय कडधान्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी.पी. दिक्षीत, कानपूर येथील अखिल भारतीय रब्बी कडधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. शैलेश त्रिपाठी, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलीक व कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे डॉ. संजीव गुप्ता मार्गदर्शन करतांना म्हणाले की आपणा सर्वांना आरोग्य हे फार्मसीकडून नाही तर शेतीकडून मिळत असते. आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रथिने हा घटक प्रामुख्याने कडधान्याद्वारे प्राप्त होतो. त्यासाठी कडधान्याच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी उच्च तापमानात टिकू शकणारे वाण विकसीत करावे लागतील. तापमानात एक डिग्रीचीही वाढ झाल्यास प्रति हेक्टरी 14 किलो उत्पादनात घट येवू शकते. झींक, सल्फर, मॉलीब्डेनम इ. सूक्ष्मअन्नद्रव्य कमतरता असणार्या जमिनीत हरभरा पिकाचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घटू शकते. यासाठी कडधान्याची लागवड करतांना योग्य पीक पध्दतीचा वापर करावा लागेल. कडधान्य व तेलबिया पिकांच्या उज्वल भविष्यासाठी संशोधनामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता, ड्रोनसारखे तंत्रज्ञान वापरुन ऑटोमायझेशनचा वापर व जीनोमिक इडिटींग यांचा वापर करावा लागेल असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. जी.पी. दिक्षीत यांनी देशातील कडधान्य व तेलबिया पिकांच्या संशोधन व प्रगतीचा आढावा सादर केला. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी यावेळी प्रास्तविकेत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. विजू अमोलीक यांनी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात तीन प्रकाशनांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कडधान्य सुधार प्रकल्पाला उत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार तर आंध्र प्रदेशातील आर.ए.आर.एस., नंदयाल या केंद्रास हरभरा पिकाच्या संशोधनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मोरोक्को देशातील इकार्डा संस्थेचे उपमहासंचालक डॉ. मायकेल बुम, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशिव पाटील, सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ, कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने, कृषिभूषण सुरसिंग पवार उपस्थित होते. सदर बैठकीस रब्बी कडधान्य पिकांवर संशोधन करणारे देशभरातील विविध राज्यातून जवळपास 150 शास्त्रज्ञांसह विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अधीर आहेर यांनी तर आभार डॉ. नंदकुमार कुटे यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button