राहुरी विद्यापीठ : लोकशाहीमध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार देवून लोकप्रतिनिधी निवडायचा हक्क दिलेला आहे. मतदान देण्यासाठी आपले नांव मतदार यादीमध्ये असणे गरजेचे आहे. या महसुल सप्ताहानिमित्त ज्या विद्यार्थ्यांचे नांव मतदान यादीत नाही त्यांनी आपले नांव मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष तथा उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भगवान ढाकरे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालय आणि महसूल विभाग, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल सप्ताहानिमित्त महसूल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. ढाकरे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन बारागाव नांदुर येथील मंडळ अधिकारी सौ. सुनंदा मरकड उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर पदव्युत्तर महाविद्यालयाचे तांत्रिक अधिकारी डॉ. सुनिल भणगे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विजय पाटील, कार्यालय अधिक्षक किरण शेळके याप्रसंगी उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शन करतांना सौ. सुनंदा मरकड म्हणाल्या शासनाने मतदार यादित नाव ऑनलाईन नोंदविणे अतिशय सुलभ केले आहे. यासाठी शासनाने क्युआर कोड उपलब्ध करुन दिलेला असून तो मोबाइलद्वारे स्कॅन करुन आपली व्यक्तिगत माहिती भरल्यास आपले नाव मतदार यादित नोंदविले जाते.
याप्रसंगी त्यांनी शासनाचे महत्वाचे कायदे, विकास योजना व विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शैक्षणीक कागदपत्रे महसुल विभागातून कसे उपलब्ध करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तांत्रिक अधिकारी डॉ. सुनिल भणगे यांनी नॅक ॲक्रीडेशनसंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय पाटील यांनी तर आभार किरण शेळके यांनी मानले.