“ही मैत्री विचारांची” या शेतकरी ग्रुपच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन मेळावा
पारनेर : शेतकऱ्यांनी सुरू केलेला “ही मैत्री विचारांची” या ग्रुपचे द्वितीय स्नेहसंमेलन दि. ३१ मे व १ जून रोजी सप्तशृंगी गड, वणी, तालुका- कळवण, जिल्हा- नाशिक येथे आयोजित केलेले आहे. या ग्रुपमध्ये नागपूर पासून कोल्हापूर पर्यंतचे सर्व पिके घेणारे शेतकरी सहभागी आहेत.
“ही मैत्री विचारांची” या ग्रुपमध्ये द्राक्ष, डाळिंब फळबाग, भाजीपाला, कापूस, कडधान्य या सर्व प्रकारच्या पिकांचे मार्गदर्शन मोफत केले जाते. क्लब हाऊस या ॲपवर दररोज संध्याकाळी साडेसात वाजता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या विषयावर तज्ञ शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते.
या ग्रुपवर दर शुक्रवारी आठवड्याचा हवामान अंदाज विजय जायभावे यांच्यामार्फत दिला जातो. अतिशय अचूक असा अंदाज शेतकऱ्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांना आपली शेतातील कामे करण्यास सहजता येते. त्याचबरोबर शासकीय योजना, बाजारभाव अंदाज या ग्रुपवर दिले जातात. हा ग्रुप पहाटे सहा वाजता सुरू होतो. दिवसभर शेतकरी आपले काम करत असताना मोबाईलवर इतर शेतकऱ्यांशी चर्चा करतात. आपल्या अडचणी समजावून घेतात. खते, औषधे, पीक पद्धती, नवीन वाण याविषयी ग्रुपमुळे सर्व शेतकरी अपडेट राहतात.
शेतात पिके घेत असताना उत्पादन खर्च कसा कमी होईल यासाठी सतत मार्गदर्शन केले जाते. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक खतांचा, औषधांचा योग्य वापर करण्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले जाते. जैविक, सेंद्रिय, रासायनिक असा मिलाप करून एकात्मिक शेती करण्यावर भर दिला जातो. त्याचबरोबर सगळीकडे जमिनीचा पीएच वाढत चालला आहे. जमिनीतील क्षारता वाढत चालली आहे, यासाठी हिरवळीचे खते वापरावर भर दिला जातो. जेणेकरून सेंद्रिय कर्ब वाढवून उत्पादन खर्च कमी होऊन पिक उत्पादन वाढेल याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते.
द्राक्षामध्ये जैविक खत आणि औषधांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करून निर्यात क्षम दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. असा हा ग्रुप शेतीसाठी अतिशय उपयोगी आहे. या ग्रुपमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील शेतकरी आहेत. तरी या ग्रुपच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून शेती मार्गदर्शन मिळवावे. क्लब हाऊस हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी तसेच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाजीराव गागरे 9765271737, गणेश सलगर 90118 31802 यांच्याशी संपर्क साधावा.