चोंडीच्या जयंती उत्सवात जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामांतराची घोषणा करा
अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती चोंडी (ता. जामखेड) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी होत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि.25 मे) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे नामांतर, आरक्षण व समाजातील विविध प्रश्न मांडण्यात आले.
कृती समितीच्या वतीने जयंती उत्सव सोहळ्यासाठी शासनाने शासकीय जयंती घोषीत करून पन्नास लाख रूपयांचा निधी जाहीर केलाबद्दल राज्य सरकारचे आभार मानण्यात आले. या पत्रकार परिषदेसाठी या पत्रकार परिषदेसाठी यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख तथा कृती समितीचे समन्वयक विजय तमनर, सचिन डफळ, राजेंद्र तागड, ज्येष्ठ नेते गंगाधर पा. तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, दत्तात्रय खेडेकर, यशवंत सेनेचे शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर, दक्षिण जिल्हाप्रमुख अशोक विरकर, समन्वयक अक्षय भांड, विनोद पाचारणे, संदिप भांड, दादाभाऊ तमनर, सचिन कोळपे, बाबासाहेब राशिनकर आदी उपस्थित होते. फक्त राजकीय स्वार्थासाठी जयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित राहून धनगर समाज बांधवांची दिशाभूल करू नये, अन्यथा भविष्यात या प्रत्येक प्रश्नाचा जाब विचारला जाणार असल्याचा कृती समितीचे समन्वयक विजय तमनर यांनी दिला.
31 मे 2023 रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जयंती कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगरची घोषणा करावी, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा ठराव सभागृहामध्ये मांडण्यात आला. परंतु आपल्याच पक्षाचे सहकारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजयजी विखे पाटील यांनी माध्यमांसमोर नामांतरापेक्षा विकास व विभाजन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यामुळे नामांतराविषयी धनगर समाज बांधवांना सरकारची भुमिका संशयास्पद वाटत आहे.
2014 साली बारामती येथील आरक्षण आंदोलनाचे उपोषण सोडताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आपण पहिल्याच बैठकीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देवू असा शब्द दिला होता, परंतु आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आरक्षणासाठी सरकारच्या वतीने टिस या संस्थेची नेमणूक केली. परंतु याच संस्थेचा अहवाल धनगर समाजाच्या विरोधात गेला. याबाबतचे दुःख धनगर समाज बांधवांच्या मनात आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावर आवाज उठविणारे धनगर समाजाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर, खासदार डॉ. विकासजी महात्मे यांना भाजप सरकारने आमदार व खासदार केल्यानंतर या नेत्यांचा आवाज दाबण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
धनगर समाजाला आदिवासी प्रमाणे ज्या योजना लागू केल्या त्या योजना कागदावरच आहेत. त्यांची अंमलबजावणी केंव्हा होणार? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. धनगर समाजासाठी असणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विकास महामंडळ व इतर महामंडळांना दिला जाणारा निधी यामध्ये खूप मोठी तफावत आहे. हा धनगर समाजावर होणारा अन्यायच आहे. असे अनेक प्रश्न धनगर समाज बांधवांच्या मनात असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी धनगर समाजाच्या या प्रश्नावर सहानुभूतीपुर्वक विचार करुन ते सोडविण्याच्या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समिती प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.